जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:45 AM2019-04-23T01:45:04+5:302019-04-23T01:46:12+5:30

भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे.

Joint effort However, the thorn in the South Mumbai collision | जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

Next

- शेफाली परब-पंडित

मुंबई : भाजपबरोबर बिघडलेले सूर लोकसभेत जुळून आल्यामुळे दक्षिण मुंबईत शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिवसेना उमेदवाराला मत म्हणजे मोदींनाच मत, अशी खूणगाठ मनाशी बांधून भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात सामील झाले आहेत, तर काँग्रेसला त्यांचा बालेकिल्ला परत मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीही जोमाने कामाला लागली आहे. मात्र, मित्रपक्षाची साथ मिळाली, तरी मतांसाठी शिवसेना-काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे ही लढाई 'काँटे की टक्करच' ठरणार आहे.

पालिका निवडणूक २०१७ मध्ये दक्षिण मुंबईतील नऊ वॉर्डांपैकी सात ठिकाणी भाजपने विजय मिळविला. देवरा कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भगवा फडकावण्याचे काम १९९६ आणि १९९९ मध्ये पहिले भाजपने केले, तर २०१४मध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत हे मोदी लाटेमुळे निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची भिस्त भाजपवर आहे. गुजराती, मारवाडी हे भाजपचे पारंपरिक मतदार असल्याने त्यांची मते शिवसेनेकडे वळविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसने आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना साथ देत आहे. या मतदारसंघात तब्बल साडेसहा लाख मराठी मतदार आहेत. ही मते काँग्रेसच्या पारड्यात पडावी, यासाठी मनसेही जोशात प्रचार करीत आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. काँग्रेसकडे मात्र कार्यकर्त्यांचे बळ कमी आहे. अशा वेळी मित्रपक्षातील कुमक ताकद वाढवत आहे. गेल्या निवडणुकीत मोदींना पाठिंबा देणारे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हेदेखील काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करू लागले आहेत. यामुळे धास्तावलेल्या शिवसेनेसाठी भाजप धावून आले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला मित्रपक्षाची साथ आणि त्यांची व्होट बँकही मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील ही प्रतिष्ठेची लढाई अटीतटीची व अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

भाजपवर भिस्त
भाजपने आपली ताकद शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात लावली आहे, परंतु त्यांचे पारंपरिक मतदार यावेळेस शिवसेनेला आपलेसे करणार का, हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीशी चांगला ताळमेळ
मित्रपक्षाबरोबर आमचा ताळमेळ उत्तम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचाही मतदारसंघ दक्षिण मुंबईतच आहे. विकास व प्रचारातही त्यांचा उत्तम सहभाग आहे.
- मिलिंद देवरा, काँग्रेस

सर्व कार्यकर्ते शक्तिनिशी मैदानात
प्रचार शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शक्तिनिशी मैदानात उतरले आहेत. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मुंबईतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात दिसतील.
- सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष

शिवसेनेला पूर्ण सहकार्य
१०१ टक्के आम्ही एकत्र आहोत. शिवसेना -भाजपचे उमेदवार अरविंद सावंत यांना आमचे पूर्ण सहकार्य असते. ते युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते, नेते पुढे आहेत.
- मंगलप्रभात लोढा, भाजप

मित्रपक्षाचा हिरिरीने प्रचार
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रचारात पूर्ण सहाकार्य मिळत आहे. प्रचार सभेत, रॅली व प्रभात फेऱ्यांनाही त्यांची हजेरी असते. ते हिरिरीने प्रचार करीत आहेत.
- अरविंद सावंत, शिवसेना

Web Title: Joint effort However, the thorn in the South Mumbai collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.