तामिळनाडूत दोन आघाड्यांत थेट लढतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 05:57 AM2019-01-30T05:57:10+5:302019-01-30T05:57:55+5:30

भाजपाची स्थानिक पक्षांशी आघाडी; वायको, कमल हसन द्रमुक-काँंग्रेसच्या आघाडीत

Indications of direct fight in Tamil Nadu in two fronts | तामिळनाडूत दोन आघाड्यांत थेट लढतीचे संकेत

तामिळनाडूत दोन आघाड्यांत थेट लढतीचे संकेत

Next

- असिफ कुरणे

तामिळनाडूत आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुक (आॅल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम ) आणि द्रमुक ( द्रविड मुनेत्र कझगम ) या प्रमुख पक्षांबरोबरच असलेल्या दोन आघाड्यांमध्येच थेट लढती होण्याची चिन्हे आहेत. अण्णा द्रमुकशी भाजपा, पीएमके व डीएमडीके यांच्या एनडीए आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, विरोधात असलेल्या द्रमुक, काँग्रेस आणि डाव्यांची यूपीए आघाडी निश्चित झाली आहे. या आघाडीत व्ही. गोपालस्वामी ऊर्फ वायको यांचा एमडीएमके व कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम (एमएनएम) हा पक्षही सहभागी होण्याची चिन्हे आहेत.

भाजपाने दक्षिणेतील खास करून द्राविडी राजकारणात शिरकाव करण्यासाठी स्थानिक पक्षांशी आघाडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. दिल्लीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अण्णा द्रमुक आणि भाजपाच्या आघाडीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यांच्यात आघाडी आणि जागाबाबत पहिल्या टप्प्यात बोलणी झाली आहेत.

अण्णा द्रमुक आणि भाजपा आघाडीत ५० टक्के जागा वाटपांवर जवळपास एकमत झाल्याच्या वृत्ताला अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. यानुसार अण्णा द्रमुकने ४० पैकी २० जागा (पुडुच्चेरीच्या एका जागेसह) तर भाजपाने २० जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव आहे. भाजपाच्या वाट्यातील २० जागांपैकी काही जागा अंबुमणी रामदास यांच्या पीएमकेला व कॅप्टन विजयकांत यांच्या डीएमडीकेला देण्यात येतील, असे दिसते. अण्णा द्रमुककडून मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे निकटवर्ती एस. पी. वेलुमणी, पी. तंगमणी तर भाजपाकडून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे द्रमुक व काँग्रेसमध्ये २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीदेखील आघाडी राहील. करुणानिधी यांच्या पुतळ््याच्या अनावरणप्रसंगी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी पसंती असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी द्रमुक, काँग्रेस आघाडीत डाव्यापक्षांसोबत कमल हसन यांनी स्थापन केलेला मक्कल निधी मय्यम (एमएनएम ) व वायको यांच्या एमडीएमकेची साथ मिळण्याची शक्यता आहे. आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार कमल हसन यांना देण्यात आले आहेत.
गेल्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत एनडीएसोबत असलेल्या वायको यांनी यावेळी स्टॅलिन यांना समर्थन दिले आहे.

जागावाटपाबद्दल अजून चर्चा सुरू असून द्रमुक सध्या काँग्रेसला १० पेक्षा कमी जागा देऊ न स्वत: २९ जागा लढवू इच्छित आहे. काँग्रेसची १५ जागांची मागणी आहे. लहान स्थानिक पक्षांना लोकसभेच्या जागा सोडायच्या की विधानसभेसाठी यावर अजून तोडगा निघालेला नाही. आतापर्यंत देशात मोठे पक्ष म्हणून सत्ता गाजवणाऱ्या भाजपा आणि काँग्रेसला द्रविडी राजकारणात आजतागायत स्वबळावर यश मिळवणे शक्य झालेले नाही. मोदी लाटेतदेखील तामिळनाडूमध्ये भाजपाला फक्त १ जागा मिळवता आली होती, तर काँग्रेस पक्षाचे खाते कोरे राहिले होते. त्यामुळे द्रविडी पक्षाच्या आडून आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न काँग्रेस, भाजपाकडून सुरू आहे.

मोदी सरकार तामिळीविरोधी
केंद्रातील मोदी सरकार तामिळनाडू विरोधी असल्याचा प्रचार विरोधकांनी चालवला आहे. अण्णा द्रमुक सरकार वाचवण्याच्या मोबदल्यात भाजपाला केंद्रातील सत्ताधारी भाजपा मदत करीत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. नीट, कावेरी, स्टरलाईट, जलीकट्टूसारख्या मुद्यांवर केंद्र सरकारने तामिळीविरोधी भूमिका घेतल्याचा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे.

रजनीकांतची भूमिका गुलदस्त्यात
सुपरस्टार रजनीकांत यांचा समाजमनावर मोठा प्रभाव आहे. राजकारणात येण्याविषयी रजनीकांत यांनी अजूनही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत; पण निवडणुकीत रजनीकांत यांचा मोठा प्रभाव दिसू शकेल. रजनीकांत लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला मदत करतील, अशी भाजपा नेत्यांना आशा आहे; पण याबद्दल रजनीकांत यांच्याकडून अजूनही काही प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकसभेच्या एकूण जागा ३९
२०१४ चा निकाल
अण्णा द्रमुक : 37
भाजपा : 01
पीएमके : 01
द्रमुक : 00
काँग्रेस : 00

Web Title: Indications of direct fight in Tamil Nadu in two fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.