The first party of Bahujan Samaj in Northern India | उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष
उत्तर भारतातील बहुजनांचा पहिला पक्ष

- संजीव साबडे
महाराष्ट्रात महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज तर तामिळनाडूमध्ये रामस्वामी नायकर, केरळमध्ये नारायण गुरू असे अनेक समाजसुधारक झाले होते. उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी उत्तर प्रदेशात ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता.
भारतात पूर्वापार उत्तरेकडील राजकारणाची सूत्रे ब्राह्मण व उच्च जातींच्या हाती होते, तर दक्षिण भारतातील तामिळनाडूपासून, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रापर्यंत सर्व राज्यांत समाज सुधारणा झाल्या होत्या.महाराष्ट्रात महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज तर तामिळनाडूमध्ये रामस्वामी नायकर, केरळमध्ये नारायण गुरू असे अनेक समाजसुधारक होऊ न गेले होते. उत्तर भारतात मात्र जातीव्यवस्था अतिशय कडवी होती, शिक्षणाचे प्रमाण कमी होते आणि जमीनदारीही मोठी होती. परिणामी ‘आहे रे’पेक्षा ‘नाही रे’ वर्ग मोठा होता. भारतीय स्वातंत्र्यानंतर दलित, आदिवासी यांना आरक्षण मिळाले. पण त्यांच्यापेक्षा काहीसा वर, तरीही उच्च जातींमध्ये न मोडणारा म्हणजे ओबीसी, मागास वा उत्तरेकडील भाषेत बोलायचे तर पिछडा हा वर्ग सर्वच क्षेत्रांत मागे होता.


काँग्रेसचे उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशातील नेते व मुख्यमंत्री प्रामुख्याने उच्च जातींतील वा ब्राह्मणच होते. दलित-आदिवासींना शिक्षण, सरकारी नोकऱ्यांत आरक्षण मिळाले होते, पण त्यांना राजकीय नेतृत्व नव्हते. दलितांवरील अत्याचार कमी होत नव्हते. तत्कालिन समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे कर्पुरी ठाकूर, राम विलास पासवान, लालुप्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, शरद यादव हे दलित वा मागास समाजातील नेते समाजवादी चळवळीकडे आकर्षित झाले. पण मुळात समाजवादी चळवळीचा जीव त्या काळात फार मोठा नव्हता.

अशा स्थितीत १९८४ साली कांशीराम यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली. त्यात प्रादेशिक अस्मितेचा नव्हे, तर दलित अस्मिेतेचा मुद्दा महत्त्वाचा होता. कांशीराम यांचा जन्म पंजाबमधील. पदवी घेतल्यानंतर त्यांना पुण्यात सरकारी नोकरी मिळाली. तिथे असताना त्यांना रिपब्लिकन पार्टीशी संबंध आला, महाराष्ट्र तसेच दक्षिणेकडील समाजसुधारकांची माहिती मिळाली. पण रिपब्लिकन नेते काँग्रेसचीच साथ सतत करतात आणि काँग्रेस त्यांचा वापर करून घेते, हे लक्षात आल्याने त्यांनी पक्षाची साथ सोडली.
पुढे १९७८ मध्ये बामसेफची (बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटिज एम्प्लॉयीज फेडरेशन) स्थापना केली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ते पाहून १९८१ साली महापरिनिर्वाण दिनी मग डीएस-फोर (दलित शोषित समाज संघर्ष समिती) संघटनासुरू केली. या संघटनेची घोषणा होती ‘ब्राह्मण, ठाकूर, बनिया चोर, बाकी सब है डीएसफोर’. त्यातूनच बहुजन समाज पक्ष उभा राहिला. शाळेत शिक्षिका असलेल्या मायावती या पक्षात येणाºया सुरुवातीच्या कार्यकर्त्या. त्याच कांशीराम यांच्या वारसदार बनल्या आणि त्यांच्या पश्चात त्याच प्रमुखही आहेत.
पंजाबमध्ये जन्मलेल्या कांशीराम यांचा बसप त्या राज्यापेक्षा उत्तर प्रदेशातच अधिक फोफावला. याचे कारण पंजाबमध्ये शीख राजकारणाचा प्रचंड प्रभाव होता. त्यापुढे बसप टिकणे अवघड होते. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपने खळबळ माजवली. मायावती तीनदा मुख्यमंत्री बनल्या. पण एकदाही त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आला नाही. त्यांनी कधी मुलायम सिंह यादव तर कधी भाजपशी समझोता केला. पण रिपब्लिकन पक्षाप्रमाणे आपला पक्ष कोणाच्या वळचणीला बांधला नाही. तसेच पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मुस्लिमांप्रमाणेच ब्राह्मण व अन्य जातींनाही सोबत घेतले आणि पक्षाचा प्रभाव वाढवत नेला. आता मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकमध्येही बसपचे आमदार आहेत. पण त्या राज्यांत त्या प्रभाव मात्र पाडू शकलेल्या नाहीत.
समाजवादी पक्षाच्या ज्या मुलायम सिंह यादव यांच्याशी वैर होते, त्यांचा मुलगा अखिलेश यांच्याशी त्यांनी यंदा समझोता केला आहे. गेल्या वर्षी पोटनिवडणुकांत केलेल्या समझोत्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाल्याने दलित, ओबीसी, मुस्लीम यांचे प्रतिनिधीत्व करणारे पक्ष आता एकत्र आहेत. बसप हा पूर्णपणे व्यक्तीकेंद्रित पक्ष आहे त्या सभेत वा पत्रकार परिषदेत काय बोलायचे, ते लिहूनच आणतात. मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्याची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. पण उत्तर प्रदेशातील दलित आजही त्यांना नेता मानतात. त्यांच्या व अखिलेश यांच्या नेतृत्वाची या लोकसभा निवडणुकांत कस लागणार आहे.
उद्याच्या अंकात : बिहारमधील यादवांचे नेते लालुप्रसाद


Web Title: The first party of Bahujan Samaj in Northern India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.