FIR against Azam Khan, Notice about Hate Speech | आझम खानविरूद्ध एफआयआर, असभ्य वक्तव्याबद्दल नोटीस
आझम खानविरूद्ध एफआयआर, असभ्य वक्तव्याबद्दल नोटीस

लखनौ : अभिनेत्री आणि रामपूरमधील भाजप उमेदवार जयाप्रदा यांची अंतर्वस्त्रे खाकी असल्याचे आपणास माहीत होते. त्या भाजपमध्ये गेल्याने ते सिद्धच झाले आहे, अशी असभ्य टिपणी करणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर जयाप्रदा यांनी टीका केली असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही आझम खान यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
खान यांच्याविरोधाात महिलांविरोधात असभ्य टिपणी केल्याबद्दल तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या विविध कलमांखाली प्रथम एफआयआर दाखल केला आहे. रामपूर येथील सभेमध्ये आझम खान यांनी जयाप्रदा यांचे नाव न घेता हे वक्तव्य केले होते.
खान यांनी मात्र भाषणात जयाप्रदा वा कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्याचप्रमाणे सकारात्मक वा नकारात्मक बाजू सांगितली नाही, असा खुलासा केला. आपण चुकीचे ठरलो तर निवडणूक लढविणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
जयाप्रदा म्हणाल्या की, आझम खान यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. ज्यांना आपण भाऊ मानत होतो, त्यांनी आता खरे रूप दाखविले. या माणसाने आपणाला यापूर्वीही त्रास दिला. अशा माणसाला निवडून दिल्यास लोकशाहीच धोक्यात येण्याची भीती आहे. (वृत्तसंस्था)


Web Title: FIR against Azam Khan, Notice about Hate Speech
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.