माथाडींच्या मतांवर डोळा, समस्यांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:43 AM2019-04-14T04:43:08+5:302019-04-14T04:43:34+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नाही, होय करत अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

Eye on Mathadi voters, ignoring problems | माथाडींच्या मतांवर डोळा, समस्यांकडे दुर्लक्ष

माथाडींच्या मतांवर डोळा, समस्यांकडे दुर्लक्ष

googlenewsNext

- दीपक शिंदे
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नाही, होय करत अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना शांत करत अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि सर्वांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या. मूळचे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य असलेल्या नरेंद्र पाटील यांनी निवडणुकीच्या दोन महिने अगोदर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर, दुसऱ्या पक्षाचे कोणी का असेना मी लढणारच, या अविर्भावात त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघात तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मिसळ खाल्ली होती. मात्र, लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने ते शिवसेनेत गेले. त्यांनी दोन महिन्यांत दोन पक्ष बदलले आणि अखेर शिवसेनेची उमेदवारी मिळविली.
सध्याच्या स्थितीत दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. बेरोजगारी, उद्योग, पायाभूत सुविधा असे मुद्दे उमेदवारांच्या प्रचारात येत आहेत, पण दुष्काळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे भिजत घोंगडे याबाबत उमेदवार चकार शब्द काढत नाहीत. त्यांना जिल्ह्याचे प्रश्न कळताहेत की जाणीवपूर्वक टाळताहेत, असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे माथाडी कामगारांच्या मतासाठी दोन्ही उमेदवारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्याबरोबरच स्थानिक प्रश्नांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. नरेंद्र पाटील उदयनराजेंवर टीका करीत आहेत, पण त्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचा आणि समस्यांचाही आढावा कधी घेणार, असा सवाल लोक करीत आहेत.
राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना निवडणुकीसाठी पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश दिले आहेत, पण एखाद दुसरा आमदार वगळता फार कोणी प्रचारात दिसत नाही. एका बाजूला कोरेगावचे आमदार आणि दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसाठी खिंड लढवत आहेत. त्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते नरेंद्र पाटलांच्या प्रचारासाठी सभा आणि बैठकांवर जोर देऊ लागले आहेत.
पाटील यांच्या एंट्रीने लढतीत रंगत आली आहे. उदयनराजेंसाठी निवडणूक आता तेवढी सोपी राहिलेली नाही.

Web Title: Eye on Mathadi voters, ignoring problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.