युती झाली तरी मनभेद कायमच, भाजपामध्ये तिकिटाचा सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:49 AM2019-03-07T05:49:57+5:302019-03-07T05:50:25+5:30

रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व हालचाली वेगात आहेत.

Despite the alliance, the mindset will always remain suspicious of the ticket in the BJP | युती झाली तरी मनभेद कायमच, भाजपामध्ये तिकिटाचा सस्पेन्स

युती झाली तरी मनभेद कायमच, भाजपामध्ये तिकिटाचा सस्पेन्स

Next

- विलास बारी
रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व हालचाली वेगात आहेत. लेवा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात यापूर्वी वाय.एस.महाजन, गुणवंतराव सरोदे, वाय. जी. महाजन, डॉ. उल्हास पाटील, हरिभाऊ जावळे व विद्यमान खासदार रक्षा खडसे या लेवा समाजाच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले आहे.
भाजपाच्या सर्वेक्षणात खा. रक्षा खडसे यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त झाली असल्याचा पद्धतशीर प्रचार करण्यात आला. त्याचे स्पष्टीकरण देण्यास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारांच्या कामाचा आणि मतदारांच्या पसंतीची आकडेवारी सादर केली. विविध आरोप झाल्याने एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अजूनही ते मंत्रिमंडळाच्या बाहेरच आहेत. भाजपामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे या दोन गटांमध्ये कार्यकर्ते विभागले गेले आहेत. त्यामुळे भाजपातर्फे रक्षा खडसे यांच्याबरोबरच आमदार हरिभाऊ जावळे यांचे नावदेखील चर्चेत आहे.
काही महिन्यांपूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचे नावही चर्चेत होते. मात्र स्वत: महाजन यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला होता. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भुसावळ नगरपालिकेतर्फे आयोजित विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री भुसावळात आले होते. त्यावेळी खा. खडसे यांच्या अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्यांच्या आजपर्यंतच्या जळगाव दौऱ्यात प्रत्येक वेळी खडसे यांना सन्मान देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व भाजपाकडून करीत आले आहेत. येत्या काळातील निवडणुकांमध्ये खडसेंची नाराजी ही पक्षाला फारशी परवडण्यासारखी नाही. त्यामुळे खा. खडसे यांचे तिकीट कायम राहू शकते.
युती झाली असली तरी रावेरमध्ये सेना-भाजपामध्ये ‘मनभेद’ कायम आहे. एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात ते शिवसेनेला वाढू देत नाहीत. सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास ते प्रशासनावर दबाव आणत असल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. गेल्या निवडणुकीत युती तोडण्यासाठी एकनाथ खडसे यांचा पुढाकार असल्याने शिवसैनिकांमध्ये तो राग कायम आहे. त्यामुळे भुसावळमधील शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ खडसे कुटुंबातील उमेदवार असल्यास
आपण प्रचार करू नये, असा ठराव करण्यात आला. काँग्रेसप्रणित आघाडीत ही जागा राष्टÑवादीकडे
आहे. मात्र काँग्रेसचा या जागेवर दावा कायम आहे.
काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आ. नीळकंठ फालक, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुनवर खान, मुक्ताईनगरचे डॉ. जगदीश पाटील व मलकापूरचे दोन जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व माजी आमदार अरुणभाई गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी यांचे नावे चर्चेत आहेत.
>सध्याची परिस्थिती
आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी रावेर लोकसभा मतदारसंघावर आपला दावा केला आहे. काँग्रेसकडून डॉ. उल्हास पाटील तर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघातील रावेर-यावल, मुक्ताईनगर-बोदवड, भुसावळ, जामनेर, मलकापूर-नांदुरा या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे आमदार आहेत. चोपडा हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात सध्या एकही विधानसभा मतदारसंघ नाही. लेवा मतदारांबरोबरच मराठा पाटील, कोळी, गुजर व दलित या समुदायाचा इथे चांगला प्रभाव आहे.

Web Title: Despite the alliance, the mindset will always remain suspicious of the ticket in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.