BJP's mechanism to weaken Congress in Gujarat | गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र
गुजरातेत काँग्रेसला कमजोर करण्याचे भाजपाचे तंत्र

- धनंजय वाखारे

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडावरून काँगे्रसने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून भाजपापुढे आव्हान उभे केले असतानाच भाजपानेगुजरातमधीलकाँग्रेसचे आमदार गळाला लावून कॉँग्रेसला कमकुवत करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या सव्वा वर्षात काँग्रेसचे पाच आमदार भाजपावासी झाले आहेत. त्यातील एकाला भाजपाने कॅबिनेट मंत्रिपदही बहाल केले आहे.

गेल्या आठवड्यातच काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. त्यापूर्वी दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. सन २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने भाजपापुढे जबरदस्त आव्हान उभे करत मोदींच्या होम ग्राउंडवरच भाजपाची दमछाक केली होती.

त्यानंतर, काँग्रेससह विरोधकांचा भाजपाविरोधी उत्साह अधिकच दुणावला होता. परिणामी, भाजपाला मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसला होता. या पराभवाने भानावर आलेल्या भाजपाने आता कॉँग्रेसला कमजोर करण्याचे तंत्र अवलंबिले असून, गुजरातमधील काँग्रेसच्या पाच आमदारांना गळाला लावले आहे. त्यात, कुंवरजी बावलिया, आशा पटेल, जवाहर चावडा, पुरुषोत्तम सावरिया आणि वल्लभ धारविया यांचा समावेश आहे. या पाच आमदारांबरोबरच काँगे्रसने आणखी एक आमदार गमावला आहे.

अवैध खाणप्रकरणी कॉँग्रेसचे आमदार भगवान बराड यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्याने गुजरात विधानसभेत त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले आहे. काँग्रेसचे ६ आमदार कमी झाल्याने आता काँग्रेसची संख्या ७७ वरून ७१वर येऊन पोहोचली आहे. मागील वर्षी जुलैमध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कुंवरजी बावलिया यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. मागील महिन्यात पहिल्यांदा गुजरात विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आशा पटेल यांनीही विधानसभा सदस्य आणि कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता गेल्या सप्ताहात कॉँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता कॉँग्रेसवर अधिक लक्ष केंद्रित केले असून, गुजरातमधील कॉँग्रेसमध्ये फोडाफोडीचे तंत्र अवलंबत पक्षाला कमजोर करण्याची तयारी आरंभली असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत कॉँग्रेसमधील नाराज गटाला भाजपाकडे खेचण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसला मात्र आत्मविश्वास
काँग्रेसचे पाच आमदार भाजपात गेले असले तरी काँग्रेसला त्याची चिंता दिसत नाही. आमदार फुटतील, पण जनता आमच्या बाजूने आहे. ते विधानसभा निवडणुकीतही सिद्ध झाले आहे.
आता हार्दिक पटेल हेही काँग्रेसमध्ये आले आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. आमदार भाजपामध्ये गेल्याने जनता भाजपाकडे वळली असे समजू नये. यंदा आम्हीच भाजपापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा मिळवू, असा दावा काँग्रेस नेते करीत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाल्याचे व त्यांच्यात आत्मविश्वास आल्याचे दिसत आहे.


Web Title: BJP's mechanism to weaken Congress in Gujarat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.