धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 05:04 AM2019-04-24T05:04:05+5:302019-04-24T05:04:59+5:30

मत विभाजनामुळे चुरस; आ. गोटे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत

The BJP and the Congress's prestige in Dhule get the result | धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Next

- राजेंद्र शर्मा

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या सरळ लढतीला आता भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे.
भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवातच धुळे येथून केली. दोघांच्या प्रचारसभा या आचारसंहिता जाहीर होण्याआधीच झाल्या. या प्रचारसभांमुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे, पण खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे. त्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांच्या उमेदवारीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. 

कारण आमदार गोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम मतांची विभागणी होणार आहे. बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. यांच्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. याशिवाय भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चितच होणार आहे. या सर्व कारणामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, हे आजच सांगणे कठीण आहे, परंतु निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हे मात्र निश्चित.

२०१४ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो. संरक्षण सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी आणला. सुलवाडे-जामफळ, कनोली उपसा योजनांकरिता अडीच हजार कोटींचा निधी आणला. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मार्गी लावला. कॉँग्रेस आघाडीने काहीच काम केले नाही.
- डॉ. सुभाष भामरे, भाजप

शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य मतदार हे गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. या मतदारसंघातील खासदार प्रचंड अकार्यक्षम असल्याने लोकांची निराशा झाली आहे. त्यामुळे सर्व जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला विजयाबद्दल विश्वास आहे.
- कुणाल पाटील, काँग्रेस

कळीचे मुद्दे
दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पाचे काम रखडल्याने मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर जामफळ - कनोली आणि तापी - प्रकाशा - बुराई या दोन प्रकल्पांसह अन्य रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

Web Title: The BJP and the Congress's prestige in Dhule get the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.