राष्ट्रवादीच्या हाती अहमदनगरची चावी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:27 AM2019-01-20T06:27:43+5:302019-01-20T06:28:01+5:30

लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो.

Ahmednagar's key in the hands of NCP | राष्ट्रवादीच्या हाती अहमदनगरची चावी

राष्ट्रवादीच्या हाती अहमदनगरची चावी

Next

- सुदाम देशमुख
लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असली तरी अहमदनगरमध्ये दोन्ही काँग्रेसपैकी कोण लढणार? हेच अद्याप ठरलेले नाही. दोघांच्या भांडणात आजवर भाजपाने इथे फायदा उठविलेला दिसतो. यावेळी मात्र, भाजपची वाटही बिकट दिसते. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्टÑवादीचे तुकाराम गडाख यांना इथे एकदा संधी मिळाली तर दिलीप गांधींच्या रुपाने सध्या भाजपाचा खासदार आहे. २००४ चा अपवाद वगळता ते सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत.
शिवसेना-भाजपामागे राज्यात ओबीसींची मोठी व्होट बँक आहे. नगरमध्येही भाजपाला याचाच फायदा झाला. १९९८ पर्यंत इथे सेना-भाजपाला शिरकाव करता आला नव्हता. १९९८-९९ मध्ये बाळासाहेब विखे सेनेच्या तिकिटावर खासदार झाले तर १९९९ मध्ये भाजपाचे दिलीप गांधी निवडून आले. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दादा पाटील शेळके व काँग्रेसचे बाबासाहेब भोस यांच्यातील मतविभागणीने गांधी संसदेत पोहचले. २००४ मध्ये भाजपा व राष्टÑवादी यांच्यात झालेल्या सरळ लढतीत भाजपाचे ना. स. फरांदे पराभूत होऊन तुकाराम गडाख विजयी झाले. २००९ साली राष्टÑवादीत बंडखोरी होऊन शिवाजी कर्डिले व राजीव राजळे हे आमनेसामने आले. त्यांच्यातील मतविभागणीचा पुन्हा गांधी यांना फायदा झाला. दोन्ही काँग्रेसमध्ये जेव्हा बिघाडी अथवा बंडखोरी झाली तेव्हा भाजपाला फायदा झाला आहे.
२०१४ मध्ये मोदी लाट भाजपाच्या मदतीला आली. आता गांधी पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपाचेच अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. नगर महापालिकेत गांधींना अपयश येऊनही त्यांनी राष्ट्रवादीच्या बळावर भाजपाचा महापौर केला. लोकसभेत याचा त्यांना फायदा होणार की तोटा हे निवडणुकीत दिसून येईल. गांधींना उमेदवारी नाकारल्यास पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, प्रा. भानुदास बेरड यांचीही चर्चा आहे. राष्टÑवादीचे नाव अद्यापही ठरलेले नाही. राष्ट्रवादीने आमदार अरुण जगताप यांच्या विचार सुरु केला होता पण त्यांचे पुत्र आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेत भाजपाला पाठिंबा दिल्याने जगताप यांचे नाव चर्चेतून बाद झाले आहे. नरेंद्र घुले, दादा कळमकर, अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे नाव आहे. पवारांनीही त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते.
राष्ट्रवादीसमोर नेहमी बंडखोरीची डोकेदुखी राहिली आहे. याहीवेळी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे स्वत: इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी त्यांची मागणी आहे. मतदारसंघ कॉंग्रेसला न सोडल्यास राष्टÑवादीसह कुठल्याही पक्षाच्या तिकीटावर किंवा अपक्ष लढू, अशी सुजय यांनी घोषणा केली आहे. एकतर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडणे किंवा विखेंशी लढण्याची तयारी ठेवणे हे दोन पर्याय राष्टÑवादीसमोर आहेत.
>सध्याची परिस्थिती
युती झाली तर हा मतदारसंघ भाजपाकडे राहील. मात्र, शिवसेनेनेही निवडणुकीची तयारी केली असून; घनश्याम शेलार हे शिवसेनेचे उमेदवार असतील. तसे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाप्रमुखांनी जाहीर केले आहे. इच्छुकांमध्ये नव्या नावांची भर पडते आहे.भाजपचा सहयोगी असलेल्या रासपनेही या जागेवर दावा केला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीही इथे उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला न सुटल्यास विखे हे कोणाची उमेदवारी घेणार? यावरही मतदारसंघातील राजकारण ढवळून निघणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, गत दोन निवडणुकीत राष्ट्रवादीला इथे विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे ही जागा आम्हाला सोडावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. ही जागा काँग्रेसला मिळाल्यास सुजय विखे हे उमेदवार असतील. त्यावेळी राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? विखे यांना राष्ट्रवादीची किती मदत मिळणार आणि त्याचा फायदा कोणाला ? याची गणिते सध्या इथे मांडली जात आहेत.

Web Title: Ahmednagar's key in the hands of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.