पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार कधी? महापालिकेचे प्रकल्प पडलेत अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:55 AM2018-01-05T02:55:13+5:302018-01-05T02:55:38+5:30

महापालिका प्रशासन विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा भूमिपूजन करत आहे. मात्र यातील अनेक प्रकल्प रेंघाळत पडल्याचे वास्तव चिंचवडमध्ये निदर्शनास येत आहे. कामात होणारी दिरंगाई व अनियोजित कामकाजामुळे अडचणी येत आहेत.

When will the rehabilitation begin? The municipal projects fall apart | पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार कधी? महापालिकेचे प्रकल्प पडलेत अर्धवट

पुनर्वसनाला मुहूर्त मिळणार कधी? महापालिकेचे प्रकल्प पडलेत अर्धवट

googlenewsNext

चिंचवड - महापालिका प्रशासन विविध विकासकामांच्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा भूमिपूजन करत आहे. मात्र यातील अनेक प्रकल्प रेंघाळत पडल्याचे वास्तव चिंचवडमध्ये निदर्शनास येत आहे. कामात होणारी दिरंगाई व अनियोजित कामकाजामुळे अडचणी येत आहेत.
चिंचवड गावातील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाले. मात्र सल्लागार व पालिका प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पात १४४० सदनिका बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यात बदल करत १००८ सदनिका बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित ठेकेदाराला दिलेल्या मुदतवाढीमुळे पालिकेचेही नुकसान झाले. केंद्र शासनाच्या १२ मे २०१५ च्या परिपत्रकानुसार जेएनएनआरयुएम कामाची मुदत १३ मार्च २०१७ ला संपली आहे. त्यामुळे ४३२ सदनिकांचे काम रखडले आहे.
या ठिकाणी ८ इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८९६ सदनिका तयार झाल्या आहेत. यातील दोन इमारतीतील २२४ सदनिकांचे वाटप करणे बाकी आहे. यामुळे येथील अडचणी वाढल्या आहेत. सदनिका ताब्यात घेण्यासाठी भरावयाची रक्कम येथील लाभार्थी भरत नसल्याने पालिका प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. येथील रहिवाशांचे स्थलांतर झाल्यास चापेकर चौकात असलेल्या अडचणी सुटणार आहेत. उर्वरित सदनिका बांधण्याचे नियोजन केल्यास सर्वच लाभार्थ्यांना घरे मिळणार असून हा झोपडपट्टी
मुक्त परिसर होणार आहे. यासाठी पुढील ३ इमारतींचे नियोजन होणे महत्त्वाचे आहे.

व्यापारी संकुल वापराविना पडून
रस्त्यावरील व्यावसायिकांना सुसज्ज अशी जागा उपलब्ध व्हावी यासाठी चिंचवडगावात २००४ मध्ये ‘चिंचवड व्यापारी संकुल’ उभारण्याचे काम सुरू झाले. या संकुलाचे अर्धवट काम झाले असताना हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी २००९ मध्ये काही नगरसेवकांनी केली. पालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत होती. या बाबतच्या निर्णयासाठीची फाईल मंत्रालयात पाठविण्यात आली. सर्व प्रकारात संकुल उभारण्याचे काम बंद पडले. हे संकुल होणार की नाही याची चर्चा फक्त सुरू होती. याकडे सर्वांनीच पाठ फिरविल्यामुळे अर्धवट अवस्थेतील या बांधकामाचा वापर बंद होता. येथे घाणीचे साम्राज्य पसरले जाते.

२०१५ मध्ये आयुक्त राजीव जाधव यांनी हे काम पुन्हा सुरू करावे, अशा सूचना दिल्या. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी मंत्रालयातील फाईल परत मागवून पालिकेने या बाबत निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले. २३ फेब्रुवारी २०१६ मध्ये पुन्हा काम सुरू झाले. २०१७ मध्ये या संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी २८ गाळे बांधण्यात आले असून १ आर्टगॅलरी व १ सांस्कृतिक हॉल बांधण्यात आला आहे. पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी फाईल पुढे पाठविली आहे. भूमी जिंदगी विभाग पुढील प्रक्रिया पूर्ण करतील व हे गाळे वापरात येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प पूर्ण झाला असला तरीही वापरात आलेला नसल्याने याची पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हवी, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू होणार कधी?
ज्या जागेत भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ती जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडांगणात आहे. येथील मोकळ्या क्रीडांगणाचा काही भाग कमी करत नव्याने सीमाभिंत बांधण्यात आली आहे. येथे रिक्त झालेल्या जागेत भाजी मंडईचे स्थलांतर होणार असल्याचे सांगत या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काम अजूनही सुरू झालेले नाही. उद्योग नगरातील जुनी पाण्याची पाइपलाइन बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे फक्त भूमिपूजन व उद्घाटन कशासाठी केले असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्वच्छतागृह केवळ शोभेसाठी!
चिंचवडगाव-आकुर्डी रस्त्यावर प्रेमलोक पार्क परिसरात मागील महिन्यात नव्याने बांधलेल्या सुलभ स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले. अनेक राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासन अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते. एक्साईड कंपनीच्या माध्यमातून याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र अद्याप ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे हे स्वच्छतागृह शोभेचे ठरत आहे. कामाची पूर्तता होण्यापूर्वीच याचे उद्घाटन करण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या या कामाबाबत नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

मंडईच्या कामास सुरुवातच नाही

भोईरनगर चौकातील वाढती समस्या व वाहतूककोंडी लक्षात घेऊन येथील भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय २०१६ ला घेण्यात आला. बाजूला असलेल्या उद्योगनगरातील क्रीडांगणाच्या सीमाभिंतीजवळ पत्र्याचे गाळे उभारून भाजी मंडईचे स्थलांतर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन जागेचे भूमिपूजन करण्यात आले. याच प्रसंगी उद्योग नगरातील वाढती लोकसंख्या पाहता येथे असणारी जुनी पाण्याची पाइपलाइन बदलण्याच्या कामाचेही उद्घाटन करण्यात आले. मात्र अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही.

वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाच्या नियोजनात सल्लागार व प्रशासनाच्या चुका झाल्याने अडचणी आल्या आहेत. येथील ३ इमारतीचे काम शिल्लक असून, दोन इमारती तयार आहेत. लाभार्थींनी पैसे भरून ताबा घेणे महत्त्वाचे आहे. यातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला असून, १४४० सदनिकांचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी व अधिकाºयांची बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चिंचवड व्यापारी संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. यातील अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करून दोन वर्षांत काम पूर्ण करून घेतले आहे. पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठीचे काम सुरू असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- अश्विनी चिंचवडे, नगरसेविका

व्यापारी संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता लवकरच सुरू होईल. पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर भूमी जिंदगी विभाग या बाबत निवेदिता काढणार आहे. वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसनच्या तीन इमारतींचे काम शिल्लक आहे. जे लाभार्थी आहेत त्यांनी नवीन घराचा ताबा घेणे महत्त्वाचे आहे. येथील रिक्त होणाºया जागेचा योग्य वापर होऊ शकतो. या साठी प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. - राजेंद्र गावडे, नगरसेवक

उद्योगनगरातील जुनी पाण्याची पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच सुरू होईल. या बाबत नियोजन पूर्ण झाले आहे. भाजी मंडईची समस्याच सोडविण्यासाठी प्रधान्य देत आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन आधीच्या सत्ताधाºयांनी केले आहे. तांत्रिक गोष्टी विचारात घेऊन नियोजन केले आहे. लवकरच येथील कामे मार्गी लागतील.
- शीतल शिंदे, नगरसेवक

ंसार्वजनिक स्वच्छता गृहाचे उद्घाटन करून महिना होत आला आहे. पालिका अधिकाºयांनी काम पूर्ण करून नियोजन करणे महत्त्वाचे होते. या ठिकाणी अजूनही पाण्याची व्यवस्था केलेली नाही. येथे देखभाल करण्यासाठी कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. या गोष्टी पूर्ण झाल्यावर उद्घाटन करणे योग्य होते. मात्र महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्याआधीच या शौचालयाचे उद्घाटन करणे योग्य नाही. या बाबत संबंधित अधिकाºयांना येथील कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. - माधुरी कुलकर्णी, नगरसेविका

Web Title: When will the rehabilitation begin? The municipal projects fall apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.