उद्योगनगरीत हायटेक गुन्हेगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 02:35 AM2018-12-13T02:35:35+5:302018-12-13T02:36:06+5:30

सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा सहभाग; व्यापारी, उद्योजक व नोकरदार महिलांची फसवणूक

Udyograth Hi-Tech Crime Increase | उद्योगनगरीत हायटेक गुन्हेगारीत वाढ

उद्योगनगरीत हायटेक गुन्हेगारीत वाढ

Next

- संजय माने 

पिंपरी : गुन्हेगारीत सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी शिरकाव केला असून, त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा ते गुन्हेगारीसाठी खुबीने वापर करू लागले आहेत. त्यामुळे उद्योगनगरीतील गुन्हेगारीला हायटेक स्वरूप आले आहे. ही हायटेक गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

उद्योगनगरीत अभियांत्रिकी, संगणक, तसेच पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतेलेले तरूण गुन्हेगारीच्या वाटेवर असल्याचे विविध गुन्हेगारी घटनांतून निदर्शनास आले आहे. हिंजवडी-वाकड परिसरात एका व्यावसायिकावर गोळीबार केलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यातील दोन आरोपी उच्चशिक्षित आहेत. अल्पावधीत बक्कळ पैसा कमाविण्याच्या उद्देशाने त्यांनी गुन्हेगारीत पाऊल टाकले आहे.

बनावट फेसबुक अकाउंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सावज जाळ्यात ओढण्याचा ‘फंडा ’त्यांनी वापरला. दक्षिणेतील अभिनेत्रीच्या छायाचित्राचा डीपी लावून ते फिर्यादीच्या संपर्कात राहिले. फिर्यादी शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश मिळवून देण्याचे, परदेशात अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळवली. त्याच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल, या दृष्टीने त्यांनी लूटमार करण्याची योजना आखली. फिर्यादी काही दिवस परगावी गेला असल्याचे फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी २० दिवसांहून अधिक काळ बाहेर गेले होते.

आरोपींनी फिर्यादी परत येण्याची प्रतीक्षा करण्यासाठी संयम बाळगला. फेसबुकच्या चॅटिंगद्वारे ते सातत्याने फिर्यादीच्या संपर्कात होते. फिर्यादी परगावहून परत येताच आरोपी त्याच्या मागावर राहिले. पुणे-बंगळुरू महामार्गावर त्यांनी फिर्यादीला गाठले. पिस्तुलाचा धाक दाखवताच, फिर्यादी पळू लागला. त्या वेळी त्यांनी गोळीबार केला. फेसबुकच्या माध्यमातून आरोपींनी सावज शोधले. मात्र त्याला लुटण्यासाठी आखलेला प्लॅन फसला. गुन्ह्यात वापरलेली मोटार सोडून पळून जाणे भाग पडले. सोडून गेलेल्या मोटारीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले.

तांत्रिक कौशल्याचा गुन्हेगारीसाठी वापर
लखनौ येथे पेट्रोल पंपावर रिमोटच्या साह्याने मीटर रीडिंग बदलण्याचे तंत्र अवलंबून कोट्यवधीच्या इंधन घोटाळ्यात सहभागी असलेले आरोपी हे पिंपरी-चिंचवडमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. तर पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमधील निगडी येथून ताब्यात घेतलेला अनुप नवनाथ सोनवणे हा आरोपी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला आहे. त्याचा साथीदार अवधूत जालिंदर गाढवे हा हॉटेल व्यावसायिक असून, गुन्हेगारी कृत्यांत आघाडीवर असल्याचे निदर्शनास आले आहे.
एटीएममध्ये छेडछाड करून बँकांना लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. तांत्रिक कौशल्याचा वापर करून बँक अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारे आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एटीएम केंद्रात बिघाड असल्याचे भासवून बँक अधिकाºयांना मेल पाठवून पुन्हा विशिष्ट खात्यात रक्कम जमा करण्यात हे भामटे अनेक घटनांमध्ये यशस्वी ठरले आहेत.

तांत्रिक ज्ञानामुळे पुरावे न ठेवण्याची दक्षता
फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर आयटी कंपनीत नोकरी करणाºया मुलीला पळवून नेण्याची धमकी देत तिच्या आईकडे पाच लाखांची खंडणी मागणाºया दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी सप्टेंबरमध्ये जेरबंद केले. बी.टेक.पर्यंतचे शिक्षण झालेले आरोपी चक्क विमानाने खंडणीची रक्कम नेण्यासाठी दिल्लीहून पुण्यात आले होते. रोहित विनोद यादव, अभिनव सतीश मिश्रा अशी त्या आरोपींची नावे आहेत. उच्चशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांनी कोणताही तांत्रिक पुरावा मागे न ठेवण्याची खबरदारी घेतली होती.

मोडस ऑपरेंडी तपासासाठी कुचकामी
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासल्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्याची पोलिसांची पारंपरिक पद्धती कुचकामी ठरू लागली आहे. गुन्हेगारांची गुन्हे करण्याची नेहमीची पद्धती अर्थात मोडस आॅपरेंडी तपासकामी लक्षात घेतली जायची. अगोदरचे कसलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेले सुशिक्षित आरोपी प्रत्येक वेळी गुन्हा करताना नवा फंडा वापरू लागले आहेत. त्यामुळे अशा आरोपींचा शोध घेताना पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलीससुद्धा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुन्ह्याचा तपास करू लागले आहेत. तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांची तपासकामी मदत घेण्यात येत आहे.

Web Title: Udyograth Hi-Tech Crime Increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.