‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:41 AM2017-11-13T05:41:43+5:302017-11-13T05:42:17+5:30

आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. 

'Shortcut' leads to fatality | ‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

‘शॉर्टकट’ ठरतोय जीवघेणा

Next
ठळक मुद्देपिंपरी रेल्वे स्थानक प्रवासी घालताहेत जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कोयना एक्सप्रेसच्या धडकेत एका महिलेसह दोन मुले ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोकलमधून उतरून रुळ ओलांडत असताना, ही दुर्घटना घडली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी प्रशस्त असा पादचारी पूल उभारला आहे. या पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. जोखीम पत्करून शॉर्टकट म्हणून अनेकजण रुळ ओलांडतात. ही परिस्थिती पिंपरीसह अन्य रेल्वे स्थानकांजवळ नेहमी पहावयास मिळते. आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सहा जणांचा रुळ ओलांडताना अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनांतून धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडणे जिवावर बेतू लागल्याचे निदर्शनास आले आहे. 
पुणे ते लोणावळा दरम्यान धावणार्‍या लोकल रेल्वेगाड्यांबरोबर या मार्गे धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची संख्याही मोठी आहे. लोकल गाड्यांच्या लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा या मार्गावर दर तासाला फेर्‍या सुरू असतात. वेळापत्रकानुसार या मार्गावरून विविध एक्सप्रेस गाड्या धावतात. मुंबईतील परेल एलफिस्टन रस्ता येथील रेल्वे स्थानकावर पूल पडला, अशी अफवा पसरल्याने एकच गर्दी उसळून चेंगराचेंगरी झाली. ४ ऑक्टोबरला घडलेल्या या दुर्घटनेत २९ जणांचा बळी गेला. मुंबईतील रेल्वे पादचारी पुलांचा सर्रास वापर होतो. 
अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक लोक या पुलावरून ये-जा करतात. याउलट परिस्थिती पुणे ते लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर पहावयास मिळते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या पादचारी पुलाचा वापर करण्याचे प्रवासी टाळतात. पुलावरून जाण्यापेक्षा शॉर्टकट म्हणून ते राजरोसपणे रुळ ओलांडतात. 

पादचारी पुलावर भिकार्‍यांचा ठिय्या 
पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून होत नाही, त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलांवरही प्रवासी दिसून येत नाहीत. या पुलाच्या पायर्‍यांवर काही ठिकाणी भिकारी झोपलेले दिसतात, तर काही पायर्‍यांवर गदरुल्यांनी आश्रय घेतल्याचे दिसून येते.
रेल्वे स्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना वेळोवेळी सुरक्षिततेसंबंधी सूचना दिल्या जातात. प्रवाशांनी धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडण्याची घाई करू नये. त्यांनी पादचारी पुलाचाच वापर करावा, असे निवेदन ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी केले जाते. परंतु त्या निवेदनाची अनेक प्रवासी गंभीर दखल घेत नाहीत.  रुळ ओलांडण्याचे प्रकार आकुर्डी, चिंचवड, कासारवाडी, दापोडी, खडकी रेल्वेस्थानकावरही पहावयास मिळतात.
 

Web Title: 'Shortcut' leads to fatality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.