‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 02:30 AM2018-12-13T02:30:28+5:302018-12-13T02:30:57+5:30

वाहतूक पोलिसाशी कारमालकाची अरेरावी

'Remove the car's jammer, or else you get the job!' | ‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’

‘गाडीचा जॅमर काढ, नाहीतर नोकरीच घालवितो तुझी!’

Next

पिंपरी : माझ्या कारला जॅमर का लावलाय? पावती करणार नाय... काय करशील... होऊन होऊन काय होईल? फाशी होईल का? कसलं चलन? आधी तू जॅमर काढ, असा एकेरी उल्लेख करून वाहतूक पोलिसाशी उद्धटपणे वागणाऱ्या, तसेच ‘तुला बघून घेतो, नोकरीच घालवतो तुझी’ असे धमकावणाऱ्या दोघांवर हिंजवडी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या अमोल जनार्दन बनसोडे (वय ३२) यांच्या समवेत हा प्रकार घडला. त्यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत पांडुरंग मालपोटे (वय ४५, रा. कातरखडक, मुळशी) आणि किरण छबन मालपोटे (वय ३०) या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. गणपत मालपोटे याला अटक झाली असून, दुसºया आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

शिवाजी चौक, हिंजवडी येथे पीएमपी थांब्याजवळ ‘नो र्पाकिंग’ फलकाखाली उभ्या मोटारींना पोलिसांनी जॅमर लावले. त्यातीलच एक एमएच १४ ईएम ७०८० या क्रमांकाची मोटार होती. मात्र, या मोटारीचे जॅमर काढ, असे एकेरी भाषेत आरोपी वाहतूक पोलिसांना सांगत होते. दंडाची पावती फाडा, नंतर जॅमर काढतो, असे सांगणाºया पोलीस कर्मचाºयाशी आरोपींनी हुज्जत घातली. जॅमर तुला काढावेच लागेल, असे शिवराळ भाषेत दरडावून पोलिसाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांशी हुज्जतीच्या प्रकारांत वाढ
हिंजवडी, वाकड परिसरात अशा प्रकारे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एका आलिशान मोटारीचा मालक वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालताना, त्याला ‘तुला पगार कितीए रे?’ असे खिजवताना दिसतो. मात्र, कायद्यापुढे सर्व समान असल्याने त्या मग्रूर मोटारचालकाला तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. अशा प्रकारे पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने कायद्याची अंमलबजावणी करणाºया पोलिसांची भीती कायदा तोडणाºयांना का वाटत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 'Remove the car's jammer, or else you get the job!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.