रावेतमध्ये ढोल-ताशांचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:30 AM2018-09-25T01:30:41+5:302018-09-25T01:31:33+5:30

वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, भोंडवेनगर, बिजलीनगर, रावेत, शिंदेवस्ती आदी भागातील जवळपास ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

Ravet Ganesh visarjan News | रावेतमध्ये ढोल-ताशांचा निनाद

रावेतमध्ये ढोल-ताशांचा निनाद

googlenewsNext

रावेत  - वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, भोंडवेनगर, बिजलीनगर, रावेत, शिंदेवस्ती आदी भागातील जवळपास ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे अकराव्या दिवशी आकर्षक रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल-ताशा, हलगी व पारंपारिक वाद्यांच्या निनादात व उत्साहात रावेत येथील जाधव घाटावर भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
मध्यरात्री दीडपर्यंत अनेक मंडळांचे विसर्जन सुरू होते. अनेक घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेशाचे विसर्जन नदीमध्ये न करता घाटावरील हौदात करून पर्यावरणाचे रक्षण केले. फुलांची आरास, त्यावरील प्रकाशरंगाची उधळण, त्यामुळे गणरायाच्या मोहक रूपाचे दर्शन होत होते. गणपती बाप्पा मोरयाचा टिपेला पोहचलेला जयघोष, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यावर तरुणांनी घेतलेला ताल, ढोल-ताशाच्या गजरासह वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावर असणाऱ्या जाधव घाटावर मुख्य सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. डीजे बंदीमुळे ढोल-ताशांच्या पथकांची संख्या वाढली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या रावेत प्राधिकरण नागरिक समिती मंडळाची मिरवणूक लक्षणीय ठरली. विसर्जन रथ आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी घातलेले फेटे, नऊवारी साडी मुख्य वैशिष्ट्य ठरले.
मिरवणुकीदरम्यान कार्यकर्ते पर्यावरण वाचवाचा संदेश देत होते. डीजेसारख्या ध्वनिप्रदूषण करणाºया पद्धतीला फाटा देऊन पारंपरिक हलगी वाद्याने परिसर दणाणून निघत होता. महिलांनी फुगडीचा फेर घेतला हे पाहून पुरुषांनासुद्धा फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही.भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त उत्कृष्ट पद्धतीने होता.
देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली २५ पोलीस कर्मचारी, ३ अधिकारी, १२ जवान, वाहतूक विभागाचे जवळपास १५ कर्मचारी, तसेच पोलिसांच्या मदतीसाठी पोलीस मित्र संघ व महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे डीवाय पाटील या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मंडळांच्या शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे व मंडळाच्या पदाधिकाºयांनी केलेल्या उत्तम सहकार्यामुळे विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार न घडता बाप्पाचे विसर्जन कमीत कमी वेळेत, शांततेत पार पडले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी सर्व मंडळांचे सहकार्याबद्दल आभार मानले. या वेळी विसर्जन घाटावर राजकीय पक्षांच्या वतीने स्वागताचे फलक लावण्यात आले होते. घरगुती मंडळाने नदीत विसर्जन न करता घाटाच्या बाजूला असलेल्या हौदात गणपतीचे विसर्जन करून मूर्तीदान केली. पालिकेच्या वतीने विसर्जन घाटावर उत्तम व्यवस्था करण्यात आली होती या मध्ये जीव रक्षक,स्वच्छता दूत,सर्व ठिकाणी उत्तम प्रकाश व्यवस्था ठेवण्यात आली होती तसेच स्वागत कमान उभारण्यात आली होती.
स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे
अकरा दिवसांच्या मुक्कामातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बाप्पा डीजे न लावण्याबाबत बुद्धी देऊन गेले. समाधानाची गोष्ट हीच की परिसरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना बाप्पा पावल्याचे दिसत आहे. न्यायालयाने बंदी घातलेली असल्याने रावेत परिसरात डीजेचा दणदणाट कोठेही दिसला नाही. गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा दिला. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने डीजेच्या दणदणाटावर बंदी घातल्यामुळे पोलीस प्रशासन कोणी मिरवणुकीसाठी डिजेचा वापर करीत आहे का याचा शोध ध्वनिमापक यंत्र घेऊन करीत होते; परंतु कोणत्याही मंडळाने ध्वनि प्रदूषणाची पातळी ओलांडली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी मिरवणुकीत ध्वनिमापक यंत्र केवळ शोभेचे ठरले, असे उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

आकर्षक रथ, पारंपरिक खेळ, बाप्पाच्या जयघोषात मिरवणुका

हिंजवडी : माण, मारुंजी, हिंजवडी परिसरात पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाच्या गजरात विविध खेळांची प्रात्यक्षिके साजरी करत आकर्षक अशा सजावट केलेल्या रथांमधून गणरायाला मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची अखेर रविवारी सांगता झाली. सातव्या, दहाव्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशी टप्प्याटप्प्यांनी या परिसरात पारंपरिक पद्धतीने गुलाल विरहित, डीजे, ढोल-ताशाच्या दणक्यात बाप्पांना निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी कृत्रिम तयार केलेल्या हौदामध्ये तर कुठे ओढा, नदी, खाण अशा ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
या परिसरात एकूण ६५ सार्वजनिक मंडळे तर ३००० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.माण मध्ये गावातील ओढ्यामध्ये गणेश मंडळांनी मूर्तींचे विसर्जन केले. डीजे, ढोल-ताशांच्या दणक्यात बाप्पांचा जयघोष करत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. मारुंजीमध्ये गावातील ओढा व दगडी खाणमध्ये गणेश मंडळांनी उत्साहात पारंपरिक पद्धतीने मूर्तींचे विसर्जन करत बाप्पांना निरोप दिला.
हिंजवडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ कृत्रिम हौद तयार करण्यात आला होता़ मानाचा समजला जाणारा श्री छत्रपती शिवाजी चौक तरुण मित्र मंडळाने बाप्पांसाठी आकर्षक असा गजरथ तयार केला होता. मुलींचे मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणारे पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. ढोल-ताशांचा दणक्यात चाललेली मिरवणूक पाहाण्यासाठी हिंजवडीकरांनी मोठी गर्दी केली होती.
त्याचबरोबर जयभवानी मित्र मंडळाचा भव्य रामरथसुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पंचरत्न तरुण मित्र मंडळानेसुद्धा यावर्षी बालाजीची मूर्ती असलेल्या भव्यदिव्य रथामधून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली होती. अतिशय शिस्तबद्धपणे कुठलेही
गालबोट न लागता या परिसरात बाप्पांना मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी
लवकर या अशा घोषना देत निरोप देण्यात आला. कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंजवडी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Ravet Ganesh visarjan News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.