जाहिरातीच्या सायकलने खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:08 AM2018-09-01T01:08:17+5:302018-09-01T01:08:45+5:30

वाहनचालकांची डोकेदुखी : महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Promoting bicycling | जाहिरातीच्या सायकलने खोळंबा

जाहिरातीच्या सायकलने खोळंबा

Next

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या ना त्या कारणाने रस्तोरस्ती गल्लीबोळात अनधिकृत फ्लेक्स लावल्याचे दिसून येतात. त्यामुळे शहराला बकालपण येत आहे. असे असतानाच तीनचाकी सायकलवर फ्लेक्स लावून जाहिरात करण्याचा नवीन फंडा सध्या रुढ होत आहे. त्यामुळे अशा फ्लेक्सच्या सायकल शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

अनधिकृत फ्लेक्स हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत फ्लेक्सची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. असे असतानाच सध्या शहरात सायकलच्या मागे एक गाडा तयार करून त्यावर चारही बाजूंनी फ्लेक्स चिटकून चालता फिरता फ्लेक्स शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. या चालत्या फिरत्या फ्लेक्समुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढलेली आहे. यावर लवकरात लवकर कारवाई करून अशा सायकली जप्त कराव्यात अशी मागणी सध्या वाहनचालक व नागरिक करत आहेत.
एखाद्याचा वाढदिवस असो एखाद्याची निवड असो किंवा एखाद्या जागेची खरेदी विक्री असो किंवा एखाद्या बांधकाम प्रकल्पाची जाहिरात असो अशा अनेक प्रकारच्या जाहिरातीचे फ्लेक्स अनाधिकृतपणे शहरातील रस्त्यावर गल्लीबोळात विद्युत खांबावर बसस्थानकवर लावून शहराला बकाल बनवण्याचे काम या संबंधित व्यक्तीकडून होत आहे. एकीकडे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असताना दुसरीकडे मात्र अशाप्रकारे अनाधिकृत फ्लेक्स लावून शहराला बकाल करण्याचे काम सुरू आहे. मात्र महापालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. असे अनाधिकृत फ्लेक्स लावणाºयांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची व पुन्हा असे फ्लेक्स न लावण्याची ताकीद द्यावी तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा या शहरातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील एकही बसथांबा असा नाही यावर विविध प्रकारच्या जाहिरातीचे स्टिकर लावण्यात आलेले नाहीत. एखादी जाहिरात करायची म्हटलं की पहिले स्टिकर लागते ते बस थांब्यावर त्यामुळे थांब्याना देखील वेगळ्याच प्रकारची अवकळा आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

मुख्य रस्त्यावरून ही सायकल जात असताना एखाद्या व्यक्तीची जाहिरात बघण्याच्या बहाण्याने झुकलेली नजर अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे या जाहिरातींना महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाने परवानगी दिलेली आहे काय, हा देखील प्रश्न आहे. महापालिकेच्या आकाशदिवे परवाना विभागाने त्यांना परवाने दिले नसतील तर अशा अनाधिकृत चालत्या फिरत्या फ्लेक्सच्या सायकलवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. सायकली अगदी रहदारीमधूनसुद्धा फिरत असल्याने वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहे. या जाहिराती वाचण्याच्या व बघण्याच्या नादात चारचाकी आणि दुचाकीस्वार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या फ्लेक्सवाल्या सायकलवर कारवाई गरजेची आहे.

शक्कल : जाहिरातबाजीचा नवा फंडा

महापालिका प्रशासनाकडून अशा अनाधिकृत फ्लेक्स जाहिरातबाजांवर कारवाई होत असल्याने अनेकांनी नामी शक्कल लढवित सायकलच्या पाठीमागे चारचाकी गाड्या तयार करून त्याच्या चारही बाजूला फ्लेक्स चिटकून चालता फिरता फ्लेक्स व्यवसाय सुरू केलेला आहे. सध्या शहरांमध्ये हे फॅड झपाट्याने पसरत असून शहरांमध्ये असे अनेक सायकलस्वार दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी देखील या जाहिरातीच्या फ्लेक्सला विद्युत रोषणाई करून हे सायकलस्वार रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. अनेक सायकल कधीकधी एखाद्या चौकात एकत्र येऊन वाहतुकीला देखील अडथळा करीत आहेत.

Web Title: Promoting bicycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.