अर्थसंकल्पाची तयारी, पिंपरी चिंचवड महापालिका, सुधारित, मूळ अर्थसंकल्पाच्या आकडेवारीस आजची मुदत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:06 AM2017-10-16T03:06:25+5:302017-10-16T03:06:40+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१७-१८ चा सुधारित आणि सन २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

Preparation of Budget, Pimpri Chinchwad Municipal Corporation, revised and updated date of original budget | अर्थसंकल्पाची तयारी, पिंपरी चिंचवड महापालिका, सुधारित, मूळ अर्थसंकल्पाच्या आकडेवारीस आजची मुदत  

अर्थसंकल्पाची तयारी, पिंपरी चिंचवड महापालिका, सुधारित, मूळ अर्थसंकल्पाच्या आकडेवारीस आजची मुदत  

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१७-१८ चा सुधारित आणि सन २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांनी सुधारित आणि मूळ अर्थसंकल्पाची आकडेवारी १६ आॅक्टोबर २०१७ पूर्वी लेखा विभागाकडे सादर करावी लागणार आहे. लेखा विभागाकडे सादर केलेल्या या आकडेवारीची योग्य छाननी व दुरुस्ती करून अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे.
स्थायी समिती सभेपुढे दिलेल्या तारखेपूर्वी अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर करायचा असल्याने त्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत. जमा व खर्चाचा योग्य अंदाज घेऊन जास्तीत जास्त अचूक अंदाज करणे सुलभ व्हावे, म्हणून सर्व विभागांनी दिलेल्या मुदतीत आपला अर्थसंकल्प लेखा शाखेकडे पाठवावा. प्रत्येक विभागाचा जमा-खर्चाचा तपशील अर्थसंकल्पाच्या ज्या नमुन्यात छापला आहे, त्या नमुन्यात तयार करावा. लेखाशीर्षाचा क्रम २०१७-१८ च्या मूळ अर्थसंकल्पातील क्रमानुसार घेण्यात यावा. मूळ अर्थसंकल्पातील क्रम चुकवू नये. सुधारित अर्थसंकल्पात एखाद्या लेखाशीर्षावर रक्कम वर्ग करण्यात आली असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख अर्थसंकल्पीय आकडेवारीत करावा. ज्या आदेशाद्वारे रक्कम एका लेखाशीर्षावरून दुसºया लेखाशीर्षावर वर्ग केली असल्यास सर्व आदेशांची अथवा ठरावांची सत्यप्रत अर्थसंकल्पीय आकडेवारीसोबत पाठवावी. सुधारित अर्थसंकल्पात मूळ अर्थसंकल्पापेक्षा जास्त रकमा मान्य होईल, हे अपेक्षित धरून कोणतीही कामे सुरू करू नये. खर्च न होणाºया रकमा आवश्यक तेवढ्या कमी कराव्यात. अर्थसंकल्पातील तरतुदीसंदर्भात आयुक्त किंवा मुख्य लेखापाल चर्चा करून आकडेवारी निश्चित करतात. त्यात काही वेळा वाढ किंवा घट केली जाते. परंतु त्याची नोंद रजिस्टरमध्ये घेतली जात नाही. त्यामुळे तरतूद कमी असताना किंवा शून्य असताना तरतुदी खर्च केल्या जातात. त्यामुळे त्या लेखाशीर्षावर जादा खर्च झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी राहणार आहे.
शहरी गरिबांसाठी सेवा-सुविधा देण्याकरिता प अर्थसंकल्प स्वतंत्र तयार केला असल्याने प अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र माहिती सादर करावी. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात एखादी नवीन योजना राबविण्यात येणार असल्यास ठळक बाब म्हणून थोडक्यात माहिती अर्थसंकल्पासोबत सादर करावी. किरकोळ दुरूस्ती-देखभालीवरील तरतुदी महसुली अर्थसंकल्पात दर्शविण्यात याव्यात. दुरूस्ती व देखभालीच्या कामासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र तरतुदी सुचवाव्यात. नवीन आणि जुन्या कामांच्या दुरुस्तीसाठी एकत्रित तरतूद सुचवू नये. डांबरी रस्ते, नवीन कामे व दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद करावी. एकाच परिसरातील त्याच स्वरूपाच्या जुन्या, तसेच नवीन दुरुस्तीच्या कामासाठी स्वतंत्र तरतूद करावी. भांडवली कामांसाठी तरतुदी सुचविताना केलेल्या तरतुदींचा लाभ अथवा फलित काय असेल याची सविस्तर माहिती द्यावी.
महापालिका विद्युत, पाणीपुरवठा, स्थापत्य, प अर्थसंकल्प आणि इतर सर्व विभागांतील मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कामांच्या वेगवेगळ्या याद्या सादर कराव्यात. क्षेत्रीय कार्यालयांनी कामांच्या याद्या स्वाक्षरीने पाठविण्याची गरज आहे.

...अन्यथा विभागप्रमुख जबाबदार
जी कामे प्राधान्याची आहेत अशाच कामांचा समावेश सुधारित व मूळ अर्थसंकल्पात प्रस्तावित करावा. त्यांच्या बिलाच्या पूर्ततेसाठी आवश्यक पूर्ण तरतूद करावी. पुरेशी तरतूद न केल्यास संबंधित विभागप्रमुखांना व्यक्तिश: जबाबदार धरून शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासकीय मान्यतेच्या रकमा प्रस्तावित करताना ब्लॉक एस्टिमेट तयार केल्यावरच प्रस्तावित कराव्यात. ब्लॉक एस्टिमेट न करता अशा रकमा प्रस्तावित केल्यास प्रत्यक्ष तांत्रिक मान्यतेच्या रकमेत आणि प्रशासकीय मान्यतेच्या रकमेत मोठी तफावत आढळून येते. या बाबींची पुनरावृत्ती होणार नाही, याची विभागप्रमुखांनी काटेकोर दक्षता घ्यावी.

Web Title: Preparation of Budget, Pimpri Chinchwad Municipal Corporation, revised and updated date of original budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.