ठळक मुद्देहिंजवडीत आयटी हब वसविण्यापूर्वीच राज्य शासनाने येथील रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी थेरगावयेथील डांगे चौकात केले.औंध-रावेत रस्यावरील जगताप डेअरी ते डांगे चौक या परिसरात रस्ते प्रशस्त होऊनदेखील दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने चौकांचा श्वास गुदमरतो आहे.

वाकड, दि. 14 - जागतिक दर्जाचे आयटी पार्क, हिंजवडीला मेट्रो रेल्वे यावी यासाठी मी लोकसभेत वारंवार आवाज उठविला. वाढत्या रहदारी व वाहनसंख्येमुळे रस्ते अपुरे पडत असल्याने हिंजवडीत आयटी हब वसविण्यापूर्वीच राज्य शासनाने येथील रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी थेरगावयेथील डांगे चौकात केले.

औंध-रावेत रस्यावरील जगताप डेअरी ते डांगे चौक या परिसरात रस्ते प्रशस्त होऊनदेखील दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने चौकांचा श्वास गुदमरतो आहे. या सदराखाली डांगे चौकात २२ कोटी रुपये खर्चून दुहेरी पूल उभारूनही वाहतूक कोंडी वाढत असल्याचे सविस्तर वृत्त लोकमत प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल खासदार बारणे यांनी घेत वाहतूक पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत डांगे चौक आणि जगताप डेअरी या चौकांची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त राजेंद्र भांबरे, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंते झुंजारे, हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, नगरसेवक ऍड. सचिन भोसले, निलेश बारणे, उपअभियंता ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते 

हफ्तेखोरीमुळे चौका-चौकात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे, या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी हिंजवडी-म्हाळुंगे आणि हिंजवडी-पुनावळे हे रस्ते लवकरात लवकर विकसीत केले पाहिजेत.  या चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे अतिक्रमण आणि अवैध प्रवाशी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या यावर आठवड्याभरात कारवाई करून रस्ता व चौक वाहतुकीसाठी खुले करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.