पिंपरी महापालिका प्रशासन करतेय सल्लागार पोसण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 01:44 PM2019-07-18T13:44:03+5:302019-07-18T13:48:38+5:30

मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.

Pimpri municipal administration why develop consultant post | पिंपरी महापालिका प्रशासन करतेय सल्लागार पोसण्याचे काम

पिंपरी महापालिका प्रशासन करतेय सल्लागार पोसण्याचे काम

Next
ठळक मुद्दे सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक

पिंपरी : महापालिकेतील विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचे प्रमाण वाढत आहे, याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत उमटले. प्रशासन सल्लागार पोसण्याचे काम करीत आहे, अशी टीका विरोधीपक्षांनी केली असून, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सल्लागार नियुक्त करावे लागत आहेत, असे उत्तर प्रशासनाने दिले आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सल्लागार नियुक्तीच्या विषयावरून जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, सल्लागारांवर महापालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. एकाच प्रकारची कामे असतील तर वेगवेगळे सल्लागार कशासाठी? यासाठी स्वतंत्र विभाग करणे गरजेचे आहे.
 राष्ट्रवादीचे चे मयूर कलाटे म्हणाले, सल्लागार नियुक्तीच्या नावाखाली लूट होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच संधी देऊन काम करवून घ्यायला हवे. सल्लागार नियुक्तीचे नवीन खूळ बंद करायला हवे.

प्रवीण भालेकर म्हणाले, सत्ताधारी विविध प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त करतात. ही चुकीची बाब आहे. याविषयी धोरण ठरविण्याची गरज आहे. सल्लागार नियुक्तीवरील खर्च टाळण्याची गरज आहे.

गीता मंचरकर म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने कोणत्याही कामांसाठी सल्लागार नेमले जातात़. सल्लागार नीट काम करतात की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे़. सल्लागारांवर होणारी उधळपट्टी थांबवायला हवी़.

अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, एकाच प्रकारची कामे असतील तर सल्लागारासाठी होणारा खर्च कमी करता येईल. शाळा बांधणीचे काम असेल तर त्यासाठी विविध कामात सल्लागारांसाठी वेगवेगळा खर्च होतो. सल्लागार नियुक्तीपेक्षा एखादा विभाग तयार करून त्यातून काम करता येते का ते पहावे. याविषयी प्रशासनाने भूमिका मांडावी. 

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराची पाच लाख लोकसंख्या होती. तेव्हापासून असणारे मनुष्यबळ आता आहे. तसेच आपला आकृतिबंधही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अभियंत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कामांना गती मिळावी, यासाठी सल्लागार घेणे आवश्यक आहे. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर सल्लागार नियुक्त करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: Pimpri municipal administration why develop consultant post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.