Pimpri Chinchwad Municipal Corporation looted by BJP leaders; Shivsena MPs allegations on bjp | भाजपा नेत्यांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेची लूट; शिवसेनेच्या खासदारांचा आरोप

ठळक मुद्देसखोल चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : शिवसेनाएका वर्षात २५० कोटींना चुना लावला, आणखी चार वर्षात किती भ्रष्टाचार होणार : आढळराव पाटील

पिंपरी : भय ना भ्रष्टाचार असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ३२५ कोटींच्या कामात ठेकेदारांची रिंग करून ९० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिवसेनेच्या खासदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 

खासदार आढळराव पाटील म्हणाले, की पुणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत असाच भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निविदा रद्द करण्यास सांगितले. असाच निर्णय मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडमधील भाजपा नेत्यांनी केलेल्या निविदा रिंग प्रकरणात घेतील. अशी अपेक्षा आहे. सात डिसेंबरला १२ ठराविक ठेकेदारांना रिंग करून ४२५ कोटींचे काम दिले आहे. ठेकेदार महापालिकेचे सुमारे या पूर्वी याच ठेकेदारांनी १५ ते २५ टक्के कमी दराने काम करत होते. तेच ठकेदार यावेळी ८ ते ९ टक्के जादा दराने निविदा भरून काम करायला पुढे आले आहेत. २५ टक्यांचा फरक सरळसरळ दिसून येत आहे. देशातील भ्रष्टाचारांच्या तुलनेत पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा वेग अधिक आहे. ठेकेदारांनी रिंग करून महापालिकेचे १०० कोंटीचे नुकसान केले आहे. त्यातून भाजपाचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने महापालिकेला लुटण्याचे काम सुरू आहे. एका वर्षात २५० कोटींना चुना लावला, आणखी चार वर्षात किती भ्रष्टाचार होणार आहे. पुणे, मुंबई, सोलापूर या महापालिकांपेक्षा मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार अधिक आहे. पिंपरी चिंचवडमधील निविदा प्रक्रिया थांबवावी, दोषींवर कारवाई करावी. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. त्यांनी दखल न घेतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार आहे. भोसरी शितलबाग पुलाच्या भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. 

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की या पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची आरोळी उठविणारे भाजपाचे पदाधिकारीच भ्रष्टाचार करू लागले आहेत. या भ्रष्टाचारास प्रशासनसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधाऱ्यांकडून लूट होत आहे. सत्तेत बसलेलेच भ्रष्टाचार करत आहेत. सत्ताधाऱ्यांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून लूट चालवली आहे.