Peaceful strike in Pimpri Chinchwad; The Pune-Mumbai road closed at Pimpri Chowk | पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद
पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून करण्यात आले नागरिकांना शांततेत बंद पाळावा, असे आवाहन सकाळी दहापासून ते सायंकाळी ५पर्यंत पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

पिंपरी : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पिंपरी-चिंचवड शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
नागरिकांनी शांततेत बंद पाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. चिंचवड स्टेशन, पिंपरी येथे दोन वाहनांवर जमावाने दगडफेक केली. एक पोलीस कर्मचारी  यामध्ये पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून त्यास तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पिंपरी चौक परिसरातील जमावाकडून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रकार घडला आहे. तर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये उभा असलेला टेम्पो फोडण्यात आला आहे. 
निगडीकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून परत वळविण्यात आली आहे. दापोडी येथील चौकात वाहतूक खोळंबली. 
बंदोबस्ताच्या ठिकाणी महेंद्र गायकवाड हे पोलीस कर्मचारी चक्कर येऊन पडले. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी उपस्थित होते. जमावाची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भीमा कोरेगाव येथील घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमावातील काहीजण चौकातून निघून गेले. सकाळी दहापासून ते सायंकाळी ५पर्यंत पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद होता. भाटनगर, निगडी, पिंपरी या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.


Web Title: Peaceful strike in Pimpri Chinchwad; The Pune-Mumbai road closed at Pimpri Chowk
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.