Notice to twenty-two companies; Polluted water directly in the river bed without processing | बावीस कंपन्यांना नोटीस; प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात

पिंपरी : शहराच्या सीमेवरून वाहणा-या मोशीतील इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू झाला. त्याची पाहणी महापौर नितीन काळजे यांनी केली. त्या वेळी नदीकाठच्या २२ कंपन्या नदीत थेट पाणी सोडत असल्याचे निदर्शनास आले. विविध रासायनिक कारखाने प्रक्रिया न करताच दूषित रासायनिक पाणी नदीपात्रात सोडत असल्यामुळे मासे मृत पावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नदी प्रदूषित करणाºया कंपन्यांवर कारवाई करा, असा आदेश महापौरांनी दिला.
उद्योगनगरीतून पवना आणि इंद्रायणी नद्या वाहतात. इंद्रायणी नदीमध्ये वनस्पती, जीव, जलचरांचा अधिवास आहे. तथापि, वाढती जलपर्णी, सांडपाण्याचा निचरा, तसेच रासायनिक पाणी मोठ्या प्रमाणात पात्रात मिसळत असल्याने जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. मोशी बंधाºयाजवळ मासे मोठ्या संख्येने मृत झाल्याचे गुरुवारी रहिवाशांच्या निदर्शनास आले. माशांचा खच पडल्याने पाण्याला दुर्गंधी सुटून नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. महापौरांकडे तक्रारी केल्यावर त्यांनी इंद्रायणी नदीची पाहणी केली. त्या वेळी महापालिका पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारी
विविध औद्योगिक कारखाने दूषित पाण्यावर कोणतीही प्रकिया न करता ते थेट नदीपात्रात सोडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याच दूषित पाण्यामुळे मासे मरत असून, नदीकाठच्या ग्रामस्थांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. मात्र, याबाबत महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यानंतर महापौरांनी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळास कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणाची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली होती. यापूर्वीही चाकण एमआयडीसीकडून सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे चिखली परिसरात इंद्रायणी नदीमध्ये मासे मृत झाले होते. ही बाब नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण या दृष्टीने हानीकारक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कारखानदारांनी प्रक्रिया करूनच पाणी नदीपात्रात सोडावे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पत्र दिले आहे. पर्यावरण विभागास सूचना केल्या आहेत. - नितीन काळजे, महापौर