लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ असा नारा देत महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने अवघ्या चार महिन्यांत श्रीमंत महापालिकेला भ्रष्टाचाराचे चराऊ कुरण केले आहे. ३१ मार्चचे कारण सांगून ठेकेदारांची सुमारे १६० कोटींची बिले अडवून भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन टक्क्यांची लूट सुरू केली आहे. या टक्केवारीची पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करणाऱ्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून, याची महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली. मात्र, भाजपाने आरोपांचा इन्कार केला आहे.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची टक्केवारी गाजत आहे. टक्केवारीवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. भाजपाचे सत्ताधारी टक्केवारी ठेकेदारांची अडवणूक करीत आहेत, अशी तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, नगरसेविका वैशाली काळभोर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप केले आहेत.
संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘पुण्यातील प्रमोद साठे या नागरिकाने पिंपरी महापालिकेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. पंतप्रधान कार्यालयाकडे ३ मे २०१७ ला तक्रार केली होती. त्यात स्थायी समिती सभापती सीमा सावळे, भाजपाचे सरचिटणीस सारंग कामतेकर
आणि महापालिकेचे मुख्य
लेखापाल राजेश लांडे यांच्यासह भाजपा नेत्यांचा उल्लेख आहे. भाजपा पदाधिका-यांनी मिळून ठेकेदारांची लूट सुरू केली आहे. याची माहिती साठे यांनी दिली आहे. या तक्रारीची सखोल चौकशी करावी.’’
तक्रारीकडे आयुक्तांचे दुर्लक्ष
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर गेल्या वर्षातील बिले मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी कामतेकर यांच्या आदेशानुसार अडविली. बिले काढण्याच्या मोबदल्यात ३ टक्के द्यावेत, असे कंत्राटदारांना सांगितले. या प्रकारामुळे कंत्राटदारांत नाराजीचे वातावरण आहे. तक्रार मिळताच पंतप्रधान कार्यालयाने ५ मे रोजी पुढील कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठविली. तथापि, तब्बल महिनाभर ही तक्रार दडवून ठेवली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तक्रारीची प्रत मागितली असता, तब्बल आठवडाभराचा विलंब करण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांनी केला आहे.
भाजपाचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर म्हणाले, ‘‘तक्रारदाराने दिलेल्या निवेदनात शेवटी मी ठेकेदार नाही किंवा इंटरेस्टेड पार्टी नाही. त्यामुळे तक्रारदार नक्की काय, असा प्रश्न उपस्थित होते.
केवळ कळतेय असे म्हणणे चुकीचे आहे. बिनबुडाचे आरोप करणे
चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावर सातत्याने आरोप करीत आहे. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. तसेच तक्रारदारामागे कोण, याचाही शोध घेण्याची गरज आहे’’

ताडपत्री चौकशीचे काय झाले?
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदीत घोटाळा झाला, गॅस शवदाहिनीत घोटाळा झाला असे आरोप केले. आम्ही सत्तेमध्ये असताना तातडीने चौकशी समित्या नेमल्या. त्यांचे अहवालही आले. मात्र, त्यातून काय निष्पन्न झाले? आमच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे नेते सत्तेत आल्यानंतर थंड झाले आहेत. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ताडपत्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडे झाले. आता पुरावे द्या, मग कारवाई करतो, असे पदाधिकारी सांगत आहेत. चौकशी समितीबाबतही प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांत संभ्रम आहे. हाच का पारदर्शक कारभार? असा सवाल संजोग वाघेरे यांनी केला.

तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी ठेकेदारांच्या प्रश्नावर बोलत आहे. एकतीस मार्चनंतरची बिले देण्याची चुकीची पद्धत थोपविण्याचे काम करीत असताना बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. चुकीच्या पद्धतीने मॉडेल वॉर्डची कामांची चौकशी लावली आहे. चौकशी लावल्याने पदाधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांना त्रास होत आहे. भाजपाची बदनामी सुरू आहे. तक्रारीची चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- सीमा सावळे, सभापती, स्थायी समिती

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्याने भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकाला काळिमा फासला गेला आहे. भाजपा नेत्यांवर आरोप झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याची गंभीर दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस