पिंपरी : खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि त्यासाठी गुन्हेगारांना पळून जाण्यास मदत करणा-या १३ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खुनाची सुपारी घेतलेल्या आरोपींना मोरवाडी न्यायालयाजवळून पळून जाण्यास मदत करणाºया चार पोलिसांना या प्रकरणी आरोपी केले आहे. कटात सहभाग असल्याप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींबरोबर पोलिसांवरही कारवाई होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे.
माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचणाºया अ‍ॅड. मंचरकर या प्रमुख आरोपीसह हमीद नवाब शेख, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदोलकर, सुरेश स्वामीनाथ झेंडे, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे, सचिन जयविलास जाधव, संतोष जगताप, गणेश अहिवळे, विजय कुर्मी, गिºया ऊर्फ विशाल गायकवाड या आरोपंीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे.

पोलीस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे यांनाही आरोपी केले आहे. १० एप्रिल २०१७ रोजी मोरवाडी न्यायालयाजवळून काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर हे आरोपी पळून गेले होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तपास केल्यानंतर काल्याला अटक झाली. त्या वेळी त्याने आरोपी कात्रज घाटातून नाही, तर पिंपरी न्यायालयाजवळून पळून गेल्याची धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीच मदत केल्याचे निदर्शनास आले.