क्रीडा समितीत सदस्यांची सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:33 AM2017-11-25T01:33:26+5:302017-11-25T01:33:57+5:30

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा समितीच्या उपसभापतींचे राजीनामा नाट्य रंगले होते. स्थायी समिती क्रीडा समितीचे विषय तहकूब ठेवत असल्याचे कारण देत क्रीडा समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांनी अगोदर उपसभापतिपदाचा राजीनामा दिला, असल्याचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र,

Members of the Sports Committee are happy | क्रीडा समितीत सदस्यांची सुंदोपसुंदी

क्रीडा समितीत सदस्यांची सुंदोपसुंदी

Next

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा समितीच्या उपसभापतींचे राजीनामा नाट्य रंगले होते. स्थायी समिती क्रीडा समितीचे विषय तहकूब ठेवत असल्याचे कारण देत क्रीडा समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांनी अगोदर उपसभापतिपदाचा राजीनामा दिला, असल्याचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, आमदारांना भेटून चर्चा केल्यानंतर राजीनामा देणार होतो, अशी सारवासारव ओव्हाळ यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर विषय समितीच्या उपसभापतींची नेमणूक केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे कट्टर कार्यकर्ते असलेले आणि भाजपाच्या चिन्हावर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा मामुर्डी, किवळे, रावेत परिसरातून निवडून आलेल्या बाळासाहेब ओव्हाळ यांची पालिकेच्या क्रीडा समितीच्या उपसभापतिपदी निवड झाली. क्रीडा समितीच्या मागील पाक्षिक सभेत निगडी, प्राधिकरण येथील पालिकेची बाहुबली व्यायामशाळा नवनाथ मित्र मंडळास सेवाशुल्क तत्त्वावर अकरा महिने चालविण्यास द्यावी, असा ठराव केला होता. तो ठराव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला. मात्र, स्थायी समितीने तो ठराव तहकूब केला. स्थायी समितीने पालिकेची बाहुबली व्यायामशाळा नवनाथ मित्र मंडळास चालविण्यास देण्याचा ठराव तहकूब केला.
त्यामुळे उपसभापती ओव्हाळ यांनी राजीनामा दिला असल्याचे, सभापती सस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, काही पदाधिकारी आणि ओव्हाळ एका आमदारांकडे गेले. चर्चा केली, त्यानंतर ओव्हाळ यांनी भूमिका बदलली़ ‘राजीनामा दिला नाही, देण्याच्या तयारीत होतो, अशी सारवासारव उपसभापती ओव्हाळ यांनी केली. तसेच क्रीडा समितीला काहीच अधिकार नाहीत. क्रीडा समितीचे विषय स्थायी समिती सभेत परस्पर बदलले जातात. त्यांची क्रीडा समितीला कोणतीही कल्पना दिली जात नाही. विश्वासात घेतले जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘क्रीडा समिती उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही. त्यांचे काय म्हणणे असेल ते ऐकूण घेण्यात येईल. त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
>नगरसेवकांनी ठेवायला हवी जाणीव
व्यायामशाळेचा ठराव दोन महिन्यांपूर्वीच मंजूर केला आहे. त्यामुळे तो विषय मंजूर केल्यानंतर पुन्हा सहा महिने मंजूर करता येत नाही. बाहुबली व्यायामशाळेचा विषय पुन्हा स्थायी समितीसमोर आला. त्या वेळी स्थायी समितीच्या चार सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे विषय फेटाळावा लागला. समिती सभागृहात सभाशास्त्राच्या नियमानुसार काम करावे लागते. याची जाणीव नगरसेवकांना असायला हवी, असे स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले.

Web Title: Members of the Sports Committee are happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.