मावळ परिसर : स्मशानभूमी नसल्याने गैरसोर्इंचा सामना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:28 AM2018-01-02T02:28:54+5:302018-01-02T02:29:21+5:30

मावळातील विविध गावांत स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर ज्याठिकाणी स्मशानभूमी आहे त्याठिकाणची देखभाल केली जात नसल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

 Mawal campus: Non-smoker face conflicts due to lack of cremation ground | मावळ परिसर : स्मशानभूमी नसल्याने गैरसोर्इंचा सामना  

मावळ परिसर : स्मशानभूमी नसल्याने गैरसोर्इंचा सामना  

Next

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे गाव व स्टेशन भागासाठी असलेली एकमेव स्मशानभूमी, गावभागातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी कसरत, अशातही तेथील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था, तर चिंचोलीत स्मशानभूमीच नसल्याने चार किलोमीटरपर्यंत करावी लागणारी पायपीट यासह करंजगाव येथील स्मशानभूमीत वाढलेले गवत यामुळे आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न. अशी स्थिती मावळातील विविध गावांमधील स्मशानभूमीबाबतची आहे. अशाप्रकारे विविध गावांत स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर ज्याठिकाणी स्मशानभूमी आहे त्याठिकाणची देखभाल केली जात नसल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना
करावा लागतो.

उघड्यावरच केले जात होते अंत्यसंस्कार

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाकसई गावाला जागेअभावी स्मशानभूमीच नसल्याने वाकसई ग्रामस्थांना सध्या अस्तित्वात असलेल्या गावालगतच्या डोंगरकडेवरील स्मशानभूमीच्या जागेवर, तर वाकसई चाळ ग्रामस्थांना नदीकाठी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत होते. पावसाळ्यात नगर परिषदेच्या वलवण येथील स्मशानभूमीत पायपीट करीत जावे लागत होते.
वाकसई ग्रामपंचायतीने याबाबत जागेचे मालक असलेले अशोक फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत काही जागा स्मशानभूमीकरिता बक्षीसपत्र करवून घेतली. तीन वर्षांपूर्वी या जागेवर डीपीडीसी फंड व लोकवर्गणी गोळा करत साडेसात लाख रुपये खर्च करून सिमेंटची प्रशस्त स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने साडेचार लाख रुपये निधीतून निवारा शेड व पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. तीन सोलर लाइट या ठिकाणी बसविण्यात आले असून, पाण्याचे अर्धा इंची कनेक्शन करण्यात आले आहे. वाकसई येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांच्या स्मरणार्थ केशकर्तनासाठी ओटा, दशक्रियेकरिता ओटा, जीवखडा ओटा, मोकळ्या जागेचे खडीकरण व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. गावापासून अर्धा किमी अंतरावर ही स्मशानभूमी असून, जागेपर्यंत सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला आहे. प्रशस्त स्मशानभूमी झाल्याने जागेअभावी अंत्यविधीची होणारी परवड थांबली आहे.

अंत्यविधीसाठी चिंचोलीकरांची चार किलोमीटरची पायपीट
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होतेय दुर्लक्ष

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रशासनाकडून शितळानगर-देहूरोड, शेलारवाडी, कोटेश्वरवाडी, किन्हई या भागात स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थापना होऊन ५९ वर्षे उलटली असताना, चिंचोली येथे स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी चिंचोलीकरांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच झेंडेमळा, काळोखे मळा, हगवणेमळा व लक्ष्मीनगर या भागातील नागरिकांनाही त्यांच्या भागात स्मशानभूमी सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, अनेकदा मागणी करूनही बोर्डाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
लोकवर्गणीतून स्मशानभूमीत सुविधा
कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गाजवळ शितळानगर येथे कॅन्टोन्मेंटने स्मशानभूमी उभारलेली आहे. देहूरोड, शितळानगर क्रमांक एक व दोन, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, थॉमस कॉलनी आदी भागातील नागरिकांसह महापालिका हद्दीतील विकासनगर भागातील नागरिकांना ही स्मशानभूमी सोईस्कर ठरत आहे. गेल्या दोन वर्षांत बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांच्या नियोजनातून व्यापारी बांधवांच्या लोकवर्गणीतून येथील स्मशानभूमीत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या वर्षी स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये खर्चून निवारा शेड उभारले. आमदार संजय भेगडे यांच्या विकास निधीतून पाच लाख रुपये खर्चून बर्निंग शेडचा विस्तार करण्यात आलेला आहे.
नागरिकांना करावा लागतोय समस्यांशी सामना
४चिंचोलीसह झेंडेमळा, काळोखेमळा, हगवणेमळा व लक्ष्मीनगर या भागात स्मशानभूमी सुविधा उपलब्ध नसल्याने पायपीट करून देहूगाव येथील ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागत आहे. चिंचोलीगावाजवळ मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लष्कराने संपादित केलेली शेतजमीन असल्याने त्यातील काही जमीन स्मशानभूमीसाठी प्रशासनाने देणे आवश्यक असताना त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील चिंचोली, झेंडेमळा भागाला प्रतीक्षा
स्मशानभूमीच्या मागणीकडे होतेय दुर्लक्ष
लोकवर्गणीतून स्मशानभूमीत विविध सुविधा
तळेगावात वाहतूक कोंडीतून जावे लागते स्मशानभूमीत
साफसफाईची धुरा आहे केवळ एका कर्मचाºयावर
स्मशानभूमीलगतची संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर

गहुंजेतील स्मशानभूमीचे विस्तारीकरण सुरू

गहुंजे : पवना नदीच्या काठी गहुंजे गावाजवळच स्मशानभूमी असून, पाच लाख ६० हजार खर्चून विस्तारीकरण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीत आठ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या निवारा शेडमुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. गहुंजे गावाच्या जनगणनेनुसार चार हजार ४६ इतकी लोकसंख्या असून, स्मशानभूमीतील बर्निंग शेडशेजारी आणखी एक शेड उभारण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू झाले असून, खोदकाम पूर्ण झाल्याचे चित्र दिसत आहे.
या कामासाठी पाच लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. निवाºयासाठी जुने पत्र्याचे शेड काढून त्या ठिकाणी नवीन भव्य शेड गेल्या वर्षी उभारण्यात आले असून, त्याकरिता गतवर्षी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून आठ लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. निवारा शेडमुळे अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी येणाºया नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
स्मशानभूमीतून नदीकडे जाण्यासाठी १४व्या वित्त आयोगातून प्राप्त ग्रामपंचायत स्तर निधीतून एक लाख ८७ हजार रुपये खर्चून गतवर्षी पायºया बांधण्यात आलेल्या आहेत. गावापासून स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बांधण्यात आलेला आहे. स्मशानभूमीमध्ये वीज, पाणी सुविधा असून, नियमित दुरुस्ती व देखभाल करण्यात येत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी येणाºयांची सोय होणार आहे.

एकाच स्मशानभूमीवर पडतोय भार

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे गाव व स्टेशन भागासाठी गाव भागातील श्री बनेश्वर ही एकमेव स्मशानभूमी आहे. स्टेशन भागातून गाव भागातील स्मशानभूमीकडे जाताना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढत सुमारे तीन किलोमीटर दूर अंतरावरील बनेश्वर स्मशानभूमीकडे जावे लागत आहे. स्मशानभूमीच्या ठिकाणी नगर परिषदेने साफसफाईसाठी केवळ एका कर्मचाºयाची नियुक्ती केली आहे. स्मशानभूमीलगत ओढा असून, त्याची संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मुस्लिम धर्मियांसाठी गाव भागात एका ठिकाणी तर ख्रिश्चन धर्मीयांसाठी मध्यवर्ती ठिकाणी एका जागी दफनभूमी आहे.

तळेगाव शहराची स्थायी-अस्थायी लोकसंख्या सुमारे १ लाखाच्या आसपास पोहोचली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्टेशन विभागात नवी स्मशानभूमी असणे गरजेचे झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून स्टेशन परिसरातील स्मशानभूमीची मागणी नागरिकांनी वारंवार उचलून धरली. निवडणुकीच्या मेनिफेस्टोतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मागणीची पूर्तता करण्याची आश्वासने दिली होती. गावातील स्मशानभूमीचा परिसर मोठा आहे. नगर परिषदेच्या आरोग्य खात्याच्या वतीने साफसफाई करण्यासाठी केवळ एका कर्मचाºयाची येथे नियुक्ती केली आहे. येथील स्वच्छतेसाठी अजून एका कर्मचाºयाची आवश्यकता आहे. स्मशानभूमीलगत ओढा असून त्याची संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे.

रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडेच्या माध्यमातून येथे गॅस शवदाहिनीची ना- नफा, ना- तोटा या तत्त्वावरची सोय गेल्या सात वर्षांपासून करण्यात आली आहे. गॅस दाहिनीच्या मागील बाजूस गवत वाढले असून, येथे घाणीचे साम्राज्य आहे. येथे डासांचे प्रमाणही वाढले आहे. स्मशानभूमीतील निवारा शेडच्या पायºयांची दुरवस्था झाली आहे. लाकडे, गोवºया, रॉकेल आणि सरणासाठी एक खासगी दुकान स्मशानभूमीजवळ असल्याने नागरिकांची सोय झाली आहे. स्टेशन भागातील स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे. मुस्लिम धर्मीयांच्या दफनभूमीचा प्रश्नही मोठा आहे. यशवंतनगर परिसरात हिंदू स्मशानभूमी शेजारीच मुस्लिम दफनभूमीची जागा निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

संकलन : विलास भेगडे, देवराम भेगडे, विशाल विकारी, अतुल चोपडे.

Web Title:  Mawal campus: Non-smoker face conflicts due to lack of cremation ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.