मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 05:54 PM2019-05-03T17:54:49+5:302019-05-03T17:57:33+5:30

क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत

Maval Lok Sabha Election: Curiosities for the Dalit and Muslim voters | मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी, ‘बसपा’च्या मतांवरून ठरणार युती की आघाडीच्या विजयाचे गणितमावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

नारायण बडगुजर 

पिंपरी : लक्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत. मावळ लोकसभा निवडणुकीत ‘वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली होती. त्यामुळे ‘वंचित’चा उमेदवार किती मते घेणार यावरच शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे कोणाला संसदेचा मार्ग सुकर होतो आणि कोणता उमेदवार त्यापासून वंचित राहील, हे २३ मे रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे. 

शाहूनगर व संभाजीनगरचा काही भाग, निगडी प्राधिकरण, संत तुकारामनगर, वल्लभनगर असा विकसित परिसर आणि झोपडपट्टीबहूल भाग असा संमिश्र मतदारसंघ म्हणून पिंपरीची ओळख आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असून, या मतदारसंघात सुमारे दोन लाख दलित आणि मुस्लिम मतदार आहेत. 
प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यामाध्यमातून राज्यभर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. मावळ मतदारसंघातून राजाराम पाटील यांनी ‘वंचित’तर्फे निवडणूक लढविली. तसेच बहुजन समाज पार्टीतर्फे अ‍ॅड. संजय कानडे रिंगणात होते. लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आझम पानसरे आणि शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघात पानसरे यांना ५२ हजार ५०१ तर बाबर यांना ५७ हजार २८९ मते मिळाली होती. बाबर यांना ४ हजार ७८८ मताधिक्य होते. बसपाचे उमेदवार उमाकांत मिश्रा यांना ५ हजार ३३ मते मिळाली होती.  
‘वंचित’मुळे केवळ दलित व मुस्लिम नव्हे तर बहुजनांतील इतर घटकांनाही आकर्षित 
करण्यात आंबेडकर आणि ओवेसी यांना यश आल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी निवडून येण्याइतका करिश्मा त्यांना साधता येणार नाही, अशीही टीप्पणी करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती पिंपरी राखीव मतदारसंघात आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नेमकी किती मते मिळविणार, त्यावर श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

दलित व मुस्लिम ऐक्यामुळे झोपडपट्टीबहूल भागात प्रभाव
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे, शेकापचे लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी पिंपरी मतदारसंघातून बारणे यांना ९५ हजार ८८९, लक्ष्मण जगताप यांना ३८ हजार ३५९ तर राहुल नार्वेकर यांना २१ हजार ७१ मते मिळाली होती. तर बसपाचे टेक्सास गायकवाड यांना ६ हजार ८९७ मते मिळाली होती. २००९ आणि २०१४ मधील मतांची आकडेवारीवरून बसपाच्या मतदारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मायावती यांचा बसपा हा उत्तर प्रदेशातील पक्ष आहे. असे असतानाही या पक्षाचा मतदार पिंपरीत आहे. मात्र यंदा महाराष्ट्राच्या मातीतील पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’चे गारुड दलित आणि मुस्लिम मतदारांवर आहे. ओवेसी आणि आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. दलित आणि मुस्लिम ऐक्याची हाक या दोघांनी दिली आणि झोपडपट्टीबहूल भागात आपला प्रभाव निर्माण केला. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. व्हीडिओ क्लिप तयार केल्या. चळवळीतील गाण्यांची त्यात भर घालण्यात आली. निळ्या निशाणाचे स्मरणही करून देण्यात आले. त्यामुळे मागास आणि झोपडपट्टीबहूल भागात ‘वंचित’ची चर्चा रंगली.

Web Title: Maval Lok Sabha Election: Curiosities for the Dalit and Muslim voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.