पिंपरी : संत तुकारामनगर येथे विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. संगीताचे वडील राम नरेश प्रसाद (वय ५८) यांनी सासरच्या छळामुळे संगीताने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. तिचा सासरी छळ होत होता, असा आरोपही केला आहे.
सिंग दांपत्य मूळचे बिहार येथील असून, ते गेल्या काही वर्षांपासून संत तुकारामनगर येथे वास्तव्यास आहे. संगीता आणि राजेश यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला आहे. तीन वर्षांची मुलगी आरोही आणि दोन वर्षांचा मुलगा अंश अशी दोन मुले त्यांना आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विवाहानंतर संगीताचा पती तिला माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, अशी मागणी करीत असे. पैसे आणत नाही म्हणून तिला अनेकदा मारहाणसुद्धा करण्यात आली. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता.