लोणावळा - लोणावळ्याजवळील कार्ला गडावर कुलस्वामींनी आई एकवीरे मंदिरात शुक्रवारी पहाटे 4.30वाजता देवीचा महानवमी होम प्रज्वलित करण्य‍ात आला. देवीचे व होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटे गडावर भाविकांची गर्दी झाली होती. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांच्या हस्ते होम करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त सल्लागार काळूराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, पार्वतीबाई पडवळ, अॅड. जयवंत देशमुख, प्रकाश पोरवाल आदी उपस्थित होते. 

अष्टमीच्या रात्री बारा वाजता देवीचे घट उठल्यानंतर होमाची तयारी सुरू झाले. पहाटे अडीच वाजल्यापासून देवीच्या धार्मिक विधीला मंदिर गाभार्‍यात सुरुवात झाली. देवीचा अभिषेक, पूजा, आरती हे धार्मिक विधि व सप्तशृंगी पाठचे उद्यापन करुन साडेचार वाजता विधिवत होम करण्यात आला. देवीच्या अंगावर चढविण्यात आलेल्या नाना प्रकारांच्या सुवर्ण अलंकारांमुळे देवीचे रुप मनमोहक दिसत होते. होमासह देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

देवीच्या नवरात्र उत्सव काळात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असल्याचे अनंत तरे यांनी सांगितले. येणार्‍या भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता देवस्थानच्या वतीने दर्शन रांग, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सुविधा आदी देण्यात आल्या होत्या. यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.