चिखलीतही कबड्डी प्रशिक्षण , सर्वसाधारण सभेची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:18 AM2019-02-06T01:18:14+5:302019-02-06T01:18:30+5:30

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे.

 Kabbadi training in Chikhli, general meeting approval | चिखलीतही कबड्डी प्रशिक्षण , सर्वसाधारण सभेची मंजुरी

चिखलीतही कबड्डी प्रशिक्षण , सर्वसाधारण सभेची मंजुरी

googlenewsNext

पिंपरी : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. त्यानंतर आता महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे यांच्यात संयुक्तपणे चिखली- कृष्णानगर येथेही कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मान्यता दिली.
कबड्डी खेळामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. तसेच शहराचे नावही क्रीडा क्षेत्रात उंचावले आहे. भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघ, चिखलीतील ब्रह्मा-विष्णू-महेश कबड्डी संघ असे अनेक नावाजलेले कबड्डी संघ शहरात आहेत. महापालिकेमार्फत भोसरीतील गावजत्रा मैदानालगत खेळाचे मैदान विकसित करण्यात येत आहे. या मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. कुस्ती केंद्राबरोबरच या मैदानात कबड्डी प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात येत आहे. या कबड्डी प्रशिक्षण केंद्रासाठी ८ कोटी ८६ लाख रुपये खर्च होणार आहे.
भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्र होत असतानाच आता महापालिकेमार्फत चिखलीतील आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे यांच्यात संयुक्तपणे कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

संतपीठ व्यवस्थापन समितीत स्थानिकांचाही समावेश
शहरात जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ स्थापन करण्यासाठी या संतपीठाच्या नावाने कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापन चालविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे कामकाज चालविण्यासाठी व्यवस्थापन समितीमध्ये शहरातील वारकरी संप्रदायातील स्थानिक ज्येष्ठ व्यक्तींचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. संतपीठाच्या कामकाजात त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग होणार आहे. त्यासाठी या समितीत शहरातील स्थानिक वारकरी संप्रदायातील ज्ञानी व ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे.

चिखली-कृष्णानगर येथे स्वामी विवेकानंद मैदानात हे कबड्डी प्रशिक्षण केंद्र होणार आहे. त्यास सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत असणाऱ्या १० ठिकाणच्या टेनिस मैदानांपैकी पाच मैदाने ख्यातनाम टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ यांना चालविण्यास देण्यात येणार आहे. या पाच टेनिस मैदानांमध्ये चिंचवड मोरया गोसावी येथील मैदानाचा समावेश आहे. मात्र, हे टेनिस कोर्ट या यादीतून वगळण्यात येणार आहे. या उपसूचनेसही मान्यता देण्यात आली.

Web Title:  Kabbadi training in Chikhli, general meeting approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.