ठळक मुद्देअनेक दिवसांपासून पाण्याची समस्या, विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठानागरिकांनी रास्ता रोको केल्याने फुगेवाडी जवळील पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी

पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. विविध भागात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शहरातील पाणी समस्या काही सुटत नाही. यास कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको केला.
फुगेवाडीत तब्बल १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. पालिकेने नागरिकांसाठी टँकरची देखील व्यवस्था केली नाही. पाणी नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी (दि. ११) रास्ता रोको केला. दरम्यान, नागरिकांनी रास्ता रोको केल्याने फुगेवाडी जवळील पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवित वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.  
स्थानिक नगरसेविका स्वाती काटे म्हणाल्या, की फुगेवाडी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करणे गरजेचे होते. मात्र, पालिकेने ते ही केले नाही. याबाबत विचारणा केली असता पालिकेकडे टँकर नसल्याचे उत्तर दिले जाते. पाणी का येत नाही याचा जाब विचारला असता, वॉल जॅम झाल्याचे कारण दिले.