थेरगाव : वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे.
गत आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे; पण त्यात मध्येच पावसाची उघडझाप सुरू असल्याने वातावरण झपाट्याने बदल होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप येणे, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंगी, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जलस्रोत दूषित होणे ही एक सामान्य बाब आहे. हे दूषित जल पिण्यामुळे जलजन्य आजार बळावले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अतिसाराचे अनेक रुग्ण दाखल आहेत. पावसाळ्यात उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

निगडी प्राधिकरण : डेंगीच्या रुग्णांत वाढ
पावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. अशा वातावरणात उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावरील पदार्थांवर वातावरणातील रोगजंतू, धूळ बसते. त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवेत, असा सल्ला सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर देत आहेत. सध्या परिसरात जिकडेतिकडे ‘खो खो’ असा एकच आवाज कानी पडत आहे.
निगडी प्राधिकरण परिसरात डेंगी आणि चिकनगुनीयाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले आहेत. या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही मोहीम राबविण्यात अडथळे येत आहेत. तसेच येथील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. प्रसंगी डासांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रोगराई वाढण्यास मदत होत आहे.