पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 07:02 PM2018-08-08T19:02:39+5:302018-08-08T19:08:32+5:30

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे .

fruad in BRTS parking project at Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांनी लाटला जादा टीडीआर, एफएसआयजादा टीडीआर आणि एफएसआय देऊन बांधकाम व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी जागा हस्तांतरीत शहरातील बीआरटीएसच्या चारही मार्गांवर ९० बीआरटीएस बसथांबे

रावेत : शहरातील बीआरटीएस मार्गाच्या दुतर्फा पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना बांधकामात सवलत देत पार्किंगसाठीची जागा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. बीआरटीएस पार्किंग म्हणून या जागा विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी काही बांधकाम व्यावसायिक या पार्किंगचा वापर सर्वसामान्य वाहनचालकांना करू देत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची कुचंबणा होत आहे. सर्वसामान्य वाहनचालकांना पार्किंगसाठी मज्जाव करून काही बांधकाम व्यावसायिकांकडून या पार्किंगचा गोरखधंदा सुरू आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (बीआरटीएस) ही जलदगती, उच्च प्रतीची आणि प्रवासी केंद्रित सार्वजनिक बस वाहतूक सेवा आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या १०० ते ३०० मीटर कॉॅरिडोरमध्ये जे काही गृहनिर्माण प्रकल्प आहेत. आणि त्या महापालिका मान्यता प्राप्त आहेत अशा सर्व इमारतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या २५ टक्के किंवा त्याहून अधिक पार्किंगची जागा टीडीआर व जादा एफएसआय देण्याचा निर्णय घेऊन महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. अशा हस्तांतरित करण्यात आलेल्या पार्किंगवर बीआरटीएसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपली वाहने पार्किंग करण्याचे हक्क असताना जवळपास सर्वच ठिकाणचे बिल्डर प्रवाशांना त्यांची वाहने पार्किंग करण्यास मज्जाव करतात.किंबहुना अनेक वाहनचालकांना पार्किंगबाबत माहिती नाही. 
हस्तांतरित करण्यात आलेली पार्किंगच्या जागेची अनेक बांधकाम व्यासायिकांनी विक्री केली आहे. त्यामुळे या पार्किंगचा वापर करणे सर्वसामान्य वाहनचालकांना शक्य होत नाही. महापालिकेने राबविलेल्या बीआरटीएस पार्किंग संकल्पनेतून टीडीआर व एफएसआयचा गोरखधंदा झाला आहे. मात्र त्याचा हिशेब मात्र महापालिकेकडे नसल्यामुळे हे पार्किंग नागरिकांसाठी असून, नसल्यासारखे आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खासगी जागेतील हे बीआरटीएस पार्किंगचा शोध घेऊन ते वाहनचालकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने औंध-रावेत, नाशिक फाटा-वाकड, निगडी- दापोडी, काळेवाडी फाटा-देहू-आळंदी रस्ता या चार मार्गांवर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी दोनच मार्ग महापालिकेला सुरू करता आले आहेत. आणखी दोन मार्गांची प्रतीक्षा आहे. या व्यतिरिक्त आणखी मार्गही बीआरटीएस अंतर्गत विकसित केले जात आहेत. मात्र बीआरटी प्रकल्प नियोजितपणे राबविणे महापालिकेला जमलेले नाही. अंमलबजावणीचाही घोळ सातत्याने पुढे येतो. त्याचेच एक उदाहरण म्हणजे बीआरटीएस पार्किंग आहे. 
.........................
जादा टीडीआर, एफएसआय लाटला
बीआरटीएस मार्गाच्या बाजूला असणाºया व्यापारी संकुल व गृह संकुलांसाठी महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना जादा टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) व एफएसआय (चटई निदेर्शांक) देण्याचा निर्णय घेतला होता. जादा टीडीआर व एफएसआयच्या बदल्यात संबंधित इमारतीमध्ये बीआरटीएससाठी पार्किंग उपलब्ध करून देणे जागा मालकांना बंधनकारक होते. हे पार्किंग बीआरटीएसने प्रवास करणाºया प्रवशांसाठी मोफत वापरता येणार होते. दरम्यान या संकल्पनेतून २००९ पासून ज्यादा टीडीआर व एफएसआय दिला गेला. पण त्याचा कोणताही हिशेब नाही. त्यातून निव्वळ गोरखधंदा झाला असून, संबंधितांनी लाखो, कोट्यवधी रुपयांचा लाभ करून घेतला. 
.........................
मूळ उद्देशाला हरताळ 
जादा टीडीआर आणि एफएसआय देऊन त्याबदल्यात बांधकाम व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी जागा हस्तांतरीत करून घेण्यात आल्या आहेत. मात्र बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. त्याला महापालिकाही प्रशासन जबाबदार आहे. टीडीआर, एफएसआयचे वाटप व पार्किंगच्या सोयीकडे बीआरटीएस व बांधकाम परवाना या दोन्ही विभागांनी लक्ष दिले नाही. पयार्याने ही सुविधा उपलब्ध असूनही तिचा वापर वाहनचालक आणि प्रवाशांना करता येत नाही. ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन हे पार्किंग शोधून नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
................................
बीआरटीएस सेवेच्या मार्गाची प्रस्तावित लांबी ४५ किलोमीटर 
१. मुंबई-पुणे जुना महामार्गावर भक्ती-शक्ती चौक ते दापोडी (१२ कि.मी.)
२. औंध-रावेत रस्ता (१४.५० कि.मी.)
३. नाशिक फाटा-वाकड (८ कि.मी.)
४. काळेवाडी फाटा-देहू आळंदी रस्ता (१०.२५ कि.मी.) 

चारही मार्गांवर ९० बसथांबे 
शहरातील बीआरटीएसच्या चारही मार्गांवर ९० बीआरटीएस बसथांबे आहेत. बीआरटीएस बसथांब्यादरम्यानचे अंतर साधारण ५०० मीटर आहे. प्रामुख्याने प्रवाशांची गरज, बांधकामास सुयोग्य जागा आणि बसथांब्यांमधील अंतर यावर त्यांची जागा निश्चित केली आहे.
.......................
महापालिका प्रशासनाने हे करणे आवश्यक
१. बीआरटीएसच्या प्रत्येक बसथांब्यावर आजूबाजूच्या ३०० मीटर अंतरावर असणाऱ्या गृहप्रकल्प इमारतीतील हस्तांतरित केलेल्या पार्किंगचे फलक नावासह लावले पाहिजेत.
२. महापालिकेला हस्तांतरीत केलेल्या पार्किंगच्या जागेचा नकाशा संबंधित जागेवर दर्शनी भागात लावावा. संबंधित ठिकाणी बीआरटीएस पार्किंग असल्याबाबतची माहिती वाहनचालकांच्या सहज निदर्शनास येईल, अशा पद्धतीने उपाययोजना करणे.
३. बीआरटीएस मार्गालगतचे अनधिकृत बांधकामे, त्यांचे जिने, पायºया हटविण्यात यावेत. 
.................................
पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण करण्यात आलेले बीआरटीएस मार्ग जलदगती प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. परंतु प्रत्येक प्रवाशाला बीआरटीएस थांब्यापर्यंत येण्या करिता स्वत:च्या वाहनाचा उपयोग करावा लागतो. ही वाहने कोठे पार्क करावी याची माहिती नसल्यामुळे त्यांना वाहने पार्क करणे जिकरीचे होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बीआरटीएस मार्ग पार्किंग नियमावली प्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी.
- श्रीकांत धनगर, अध्यक्ष, जय मल्हार प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
...............................
मी प्रवासासाठी नेहमी किवळे-औंध या बीआरटीएस बसचा वापर करतो. सदर मार्ग आणि माझे घर यातील अंतर अधिक आहे. त्यामुळे बीआरटीएस बसथांब्यापर्यंत मला माझी दुचाकी घेऊन जावे लागते. परंतु ती कोठे पार्क करायची, हा प्रश्न असतो. बीआरटीएस मार्ग पार्किंग नियमावलीनुसार उपलब्ध असणाऱ्या पार्किंगच्या जागेची माहिती प्रत्येक बीआरटीएस थांब्यांमध्ये लावावी.
- विनायक बडगुजर, विधीतज्ज्ञ, रावेत

Web Title: fruad in BRTS parking project at Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.