शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:05 AM2019-01-23T02:05:13+5:302019-01-23T02:05:22+5:30

नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे.

 Farming donations to farmers from the farm | शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

शेतकऱ्यांकडून रस्त्यासाठी शेतजमिनीचे दान

Next

- देवराम भेगडे 

देहूरोड : नागरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वत्र जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. जमिनीवरून सख्खे भाऊ आणि बहिणी, भावकी व शेजारी यांचे वाद होत आहेत. विविध सरकारी प्रकल्प, रस्ते, नागरी भागातील विकास आराखड्यातील सुविधा विकसित करण्यासाठी मोबदला मिळणार असतानाही जमीन मालक व शेतकरी त्याकरिता जमीन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महत्त्वाचे विकास प्रकल्प, रिंगरोड, आरक्षणे विकसनाची कामे होऊ शकलेली नाहीत. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील किन्हई गावातील शेतकºयांनी कसलाही मोबादला न घेता अडीच किलोमीटर लांबीचा किन्हई ते शेलारवाडी दरम्यानचा सार्वजनिक रस्ता उभारण्यासाठी मोफत जमीन दाने केली आहे.
शेतकºयांनी जमीन उपलब्ध करून दिल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या अ‍ॅड. अरुणा पिंजण यांच्या प्रयत्नातून कॅन्टोन्मेंटकडून यंत्रसामग्रीचे सहकार्य घेऊन १५ दिवसांत मुरूमाचा कायमस्वरूपी पक्का रस्ता तयार केला आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील किन्हई गावातील बहुतांशी शेतजमिनी विविध लष्करी प्रकल्पांसाठी सुरुवातीला ब्रिटिश सरकार व देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने संपादित केलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. त्यातच देहूरोड व इतर भागात ये-जा करण्यासाठी लष्करी भागातील त्यांच्या ताब्यातील एकाच रस्त्यावर अवलंबून राहावे लागत होते. शेलारवाडी, तळेगाव दाभाडे व मावळ भागात जाण्यासाठी नऊ- दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. किन्हई ते
शेलारवाडी रस्ता करण्याची
अनेकदा मागणी होत होती. २०१९ वर्षाच्या सुरुवातीच्या मुहूर्तावर काम सुरू झाले आहे.
>शेतातील पिके काढून दिली जमीन
अ‍ॅड. अरुणा पिंजण यांनी किन्हई -शेलारवाडी रस्ता करण्यासाठी गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांची बैठक घेतली. संबंधित रस्ता तयार करण्यासाठी सरकारी पातळीवर नवीन रस्त्याची मागणी, सर्वेक्षण, भूसंपादन, संभाव्य अडचणी, जमीन मोबदला, नुकसान भरपाई, अंदाजपत्रक मंजुरी, रस्ता बांधकाम मंजुरी आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाले तरच रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकरिता मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच शेतकºयांनी मोबदला न घेता रस्त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास रस्ता तयार करणे शक्य असल्याचे या बैठकीत पिंजण यांनी सांगितले. पिंजण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत किन्हईतील २२ शेतकºयांनी पिके काढून घेत रस्त्यासाठी जमीन दिली.
१५ दिवसांत अडीच किलोमीटर रस्ता
कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्याच्या कामासाठी लागणारी दोन यंत्रे व दोन डंफर अशी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. एका शेतकºयाने त्याच्या जमिनीतील मुरूम उपलब्ध करून दिला असून, अवघ्या १५ दिवसांत अडीच किलोमीटर लांब व १५ फूट रूंदीचा पक्का रस्ता सुमारे पाच लाख रुपये खर्चात तयार झाला असून, मावळचे आमदार बाळा भेगडे, सर्व बोर्ड सदस्य, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी समारंभपूर्वक खुला करण्यात आला आहे.
>किन्हईतील शेतकºयांनी यापूर्वी संरक्षण विभागाच्या प्रकल्पां-साठी जमिनी दिलेल्या आहेत. असे असतानाही रस्त्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा रस्त्यासाठी मोफत जमीन देण्यास एकाच बैठकीत संमती दिली. रस्त्यासाठी सहकार्य करून वेगळा आदर्श या शेतकºयांनी ठेवला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन व पदाधिकाºयांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याने रस्ता तयार झाला आहे.
- अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्या, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

Web Title:  Farming donations to farmers from the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.