दिंडीने संगीत संमेलनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:52 AM2018-02-23T00:52:11+5:302018-02-23T00:52:25+5:30

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली.

Dindi launches music concert | दिंडीने संगीत संमेलनाला सुरूवात

दिंडीने संगीत संमेलनाला सुरूवात

googlenewsNext

पिंपरी : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आयोजित संगीत संमेलनाची सुरुवात निगडी प्राधिकरण येथील माऊली उद्यानापासून निघालेल्या संगीत दिंडीने झाली. देवी सरस्वती, ग्रंथ संगीत रत्नाकर व विविध वाद्ये यांचे पूजन केले. यात पारंपरिक वेशभूषा केलेले पाचवी ते सातवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडी वाजतगाजत आणि प्रबोधन गीते म्हणत शाळेपर्यंत आली. प्राथमिक विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराजवळ आनंद व उत्साहात दिंडीचे स्वागत केले.
पंडित भीमसेन जोशी संगीत नगरीमध्ये संमेलन अध्यक्ष रामदास पळसुले, उपाध्यक्ष समीर दुबळे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, केंद्रप्रमुख वामन अभ्यंकर, केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, केंद्र व्यवस्थापक यशवंत लिमये, मुख्याध्यापिका प्रज्ञा पाटील, अलका शाळू, नचिकेत देव, शीतल कापशीकर, किशोर जाधव या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. नचिकेत देव यांच्या सुरेल गणेशवंदनेने कार्यक्रमाची संगीतमय सुरुवात झाली.
संगीत ही नुसती कला नसून ते एक शास्त्र आहे म्हणूनच त्याचा विशेष अभ्यास विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी मिळून करण्याच्या उद्देशाने या संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रास्ताविक मनोज देवळेकर यांनी मांडले.
लहानपणी घेतलेले चांगले अनुभव हे मोठेपणीच्या उज्ज्वल स्वप्नांचे बीज रुजवतात. कलेकडे व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा आनंद, साधना म्हणून बघितले, तरच त्या कलेचा परमोच्च आनंद घेता येतो. अशी दृष्टी देण्यासाठी, तसेच गुरू मिळण्याचे भाग्य असायला हवे. उत्तम गुरू लाभले, तरी त्याचे सोने करण्यासाठी अथक प्रयत्न, रियाज करण्याचीही तयारी हवी. संधी जेव्हा शालेय जीवनात मिळाली, तर त्याचा जरूर लाभ घ्या. सदैव कष्ट घेण्याची तयारी, गुरूवर श्रद्धा ठेवली, तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे विचार संमेलनाध्यक्ष रामदास पळसुले यांनी आपल्या बीज भाषणात मांडले.
संगीत हे फक्त कला माध्यम नसून यातून संपूर्ण अभिव्यक्ती विकास साधतो. या दोन दिवसांच्या संमेलनातून भावी सांगीतिक वाटचालीची दिशा प्रत्येकाला मिळू दे. उत्तम कलाकार होण्याबरोबरच आस्वाद घेणारे रसिकही यातून तयार होऊ दे, असे सांगत संचालक गिरीश बापट यांनी उद्घाटन सोहळ्याची सांगता केली.


कीर्तनाविष्कारास दाद
पिंपरी : संमेलनाचे द्वितीय सत्र ‘संगीताचे सादरीकरण’ या विषयावर झाले. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी छोटेसे कीर्तनाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांना संवादिनीवर रेशीम खेडकर तर तबला मिलिंद तायवडे यांनी साथ दिली. यात आफळे यांनी ‘नमन माझे गजवंदना’ या गणेश गीत व कथेचे अतिशय सुरस सादरीकरण केले. हे करताना कीर्तन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते याविषयी माहिती दिली.
कीर्तन सादरीकरण एकूण आठ भागांत विभागलेले आहे़ हे त्यांनी प्रत्यक्ष एक एक भाग उलगडत सांगितले. कीर्तनातून चांगल्यामध्ये सहभागी व्हायचा संस्कार आहे. कीर्तन ही श्रवणीय व प्रेक्षणीय कला आहे. यात बोलावे कसे, गायन कसे करावे, उभे कसे राहावे याचा अभ्यास असतो. उत्तम सादरीकरण करताना वेळेचे भान राखता यायला हवे, दिलेल्या वेळेत आपली कला सादर करताना तितकेच प्रभावी होण्यासाठी योग्य अभ्यास हवा. कीर्तनातील वादन हे फक्त साथसंगत इतकेच मर्यादित नसून अभंग, श्लोक, कथा यांचे विवेचन करताना वातावरण निर्मितीसाठीही उपयुक्त असतात. असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी सहजतेने सांगत आफळे यांनी सर्वांचीच मने जिंकली. त्यांनतर या विषयाची अधिक माहिती परिसंवाद व प्रात्यक्षिक स्वरूपात दिली. याची सूत्रे अतिशय प्रभावीपणे सांभाळत श्रेष्ठ कलाकारांकडून त्यांच्या कलेची तोंडओळख सर्वांना करून दिली. यात सर्वप्रथम शास्त्रीय संगीताविषयी डॉ. पौर्णिमा धुमाळे यांनी यमन रागातील दर्शन देवो मज शंकर महादेव ही बंदिश व एक सुंदर तराना याचे सादरीकरण करत त्याविषयी सविस्तर माहिती दिली.

Web Title: Dindi launches music concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.