पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:19 PM2019-02-22T12:19:52+5:302019-02-22T12:22:36+5:30

पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते.

A crime registered against the contractor for temple accident in Pimpale Gurav | पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल 

पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल 

googlenewsNext
ठळक मुद्दे संबंधित बांधकाम पाडुन टाकण्याबाबत १६ नोव्हेंबर २०१८ ला महापालिकेने बजावली होती नोटीस मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना काम ठेवले सुरू

पिंपरी : पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले. या प्रकरणी मजुरांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली नाही, म्हणुन मंदिर बांधकामाचा ठेका घेतलेल्या राहुल जयप्रकाश जगताप (वय ३६,रा.बारामती) यांच्यावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, नदीकाठी मंदिराचे सुरू असलेले बांधकाम अनधिकृत असल्याबद्दल महापालिकेच्या बांधकाम परवाना व अतिक्रमण निर्मुलन विभागाने नोटीसव्दारे कळविले होते. संबंधित बांधकाम पाडुन टाकण्याबाबत १६ नोव्हेंबर २०१८ ला महापालिकेने नोटीस बजावली होती. तरी ही ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना काम सुरू ठेवले होते. मजुरांना सेफटी बेल्ट, शेफ्टी बूट, सुरक्षा जाळी अशी कोणतीही सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती. ही बाब निदर्शनास आल्याने मजुरांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी ठेकेदार जगताप यांच्याविरूद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पिंपळे गुरव येथे मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मनतोष संजीव दास (वय ३०, रा. कामगार वसाहत, पिंपळे गुरव), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५, कामगार वसाहत) या कामगारांचा समावेश आहे. सिद्धम्मा मानसप्पा पुजारी (वय ३०, रा. गोपीचाळ, खडकी) या कामगार महिलेचा मृत्यू झाला. तर शामोन सरदार, सेवाराम राजकुमार साहू, कृष्णा पवार, कमलेश कांबळे, आयप्पा मल्या सुभंड, धनंजय चंदू धोत्रे, योगेश मच्छिंद्र मासाळकर, कमलेश मालिकराम, अयप्पा मलप्पा सुगड हे मजूर दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वायसीएम तसेच औंध येथील सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडून येत आहे.

Web Title: A crime registered against the contractor for temple accident in Pimpale Gurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.