वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकामे हटविली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 08:29 PM2018-06-01T20:29:41+5:302018-06-01T20:29:41+5:30

पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बांधकामे भुईसपाट केली.

Construction destroyed for Walhekarwadi -Ravet road | वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकामे हटविली 

वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बांधकामे हटविली 

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण होईल काही दिवसांत चिंचवडे फार्म ते जुना जकात नाका दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात येणार

पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी - रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या व पक्क्या स्वरूपातील जवळपास ६० बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने धडक कारवाई करत जागा ताब्यात घेतली. जवळपास ५४ व्यावसायिक बांधकामे व सहा निवासी घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवला. यात काही अतिक्रमणधारकांनी स्वत: बांधकामे हटविली.
या कारवाईच्या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, झोन तीनचे क्षत्रिय अधिकारी अनिल दुधलवार, तहसिलदार वर्षा पवार, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे, निगडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक काळूराम लोहकरे, प्राधिकरणाचे ४० कर्मचारी व चिंचवडचे ३५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ४ जेसीबी, २ पोकलेन, ३ डंपरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि.१जून) सकाळी ९ वाजल्यापासून वाल्हेकरवाडी - रावेत मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते दगडू चिंचवडे चौकापर्यंत (स्पाईन रोड टी जंक्शन) पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बांधकामे भुईसपाट केली. रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने २६ मे रोजी अंतिम नोटिसा दिल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याकरिता आवश्यक असणाºया जागेचे भूसंपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील सर्व्हे क्रमांक ११५ ते १२१ मधील ६० बांधकामांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वे क्रमांक १२० आणि १२१ मधील बाधित घरांवर बुलडोझर फिरवून घरे भुईसपाट केली. 
अतिक्रमण बांधकामधारकांचे सहकार्य 
शहरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईवेळी अनेक ठिकाणी विरोध होऊन कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. काही वेळा अनुचित प्रकार देखील घडतात. परंतु, या परिसरातील कारवाई अगोदरच काही दिवस नागरिकांनी स्वत: आपली अतिक्रमणे काढून घेत वाल्हेकरवाडी भागाच्या विकासासाठी हातभार लावला. याबद्दल प्राधिकरण प्रशासनाने या अतिक्रमण बाधितांचे कौतुक केले. नोटीस मिळाल्यानंतर नागरिकांनी स्वत: भरपूर बांधकामे काढून सहकार्याचीभावना दाखविली. हा आगळा वेगळा प्रसंग येथे पाहावयास मिळाला.
..........................
रावेत - वाल्हेकरवाडी-चिंचवड जुना जकात नाका या रस्त्याचे काम भू संपादनामुळे रखडलेल्या अवस्थेत होते. काही महिन्यांपूर्वी वाल्हेकरवाडी ते रावेत मार्गावरील ओढ्यापर्यंतची बांधकामे भुईसपाट करून रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यात आली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिंचवड जुना जकात नाक्यापर्यंतची जागा ताब्यात घेण्याचे राहिले होते. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारच्या कारवाईत छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते स्पाईन रोड दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. काही दिवसांत चिंचवडे फार्म ते जुना जकात नाका दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नागरिकांनी कारवाई बाबत प्रथमच चांगले सहकार्य केले. असेच सहकार्य राहिले तर लवकरात लवकर काम पूर्ण होईल. रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण होईल्. 
- अनिल दुधालवर, क्षत्रिय अधिकारी झोन ३, प्राधिकरण

Web Title: Construction destroyed for Walhekarwadi -Ravet road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.