दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:02 PM2019-07-10T15:02:30+5:302019-07-10T15:10:46+5:30

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात.

The burden of school bag and big crowed in school vans | दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये दाटीवाटी

Next
ठळक मुद्देवाहनांची जीपीएस कुचकामी आधुनिक सुविधेचा बोलबालाखासगी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूकवाहतूक समित्या निरर्थकशाळेत कागदोपत्री फक्त नोंदवाहनांची होत नाही तपासणी आरटीओचे नियम पायदळी

लोकमत पाहणी 
पिंपरी : पाठीवर न पेलणारे दफ्तराचे ओझे, व्हॅनमध्ये अक्षरश: कोंबून बसविलेले विद्यार्थी अशा पद्धतीने रोजच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या समस्येवर तोडगा निघणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 
विद्यार्थ्यांना लहान वयात दाटीवाटीने रिक्षा, व्हॅनमधून प्रवास करावा लागतो आहे. खरे तर त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयातील मुलांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी वाहतूक व्यवस्था गरजेची आहे. शाळेत जाण्यासाठीची व्हॅन, रिक्षा यामध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. अनेकदा अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत. नाईलाजास्तव एखाद दुसऱ्या दिवसी दाटीवाटीने रिक्षात अथवा व्हॅनमध्ये बसून जाणे विद्यार्थी सहन करतील, मात्र रोजच त्यांना असा प्रवास करावा लागत असल्याने एक प्रकारे त्यांना ही शिक्षाच वाटू लागली आहे. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून पालकांनी दक्षता घ्यावी.
......
(संकलन : पराग कुंकूलोळ, शिवप्रसाद डांगे, प्रमोद सस्ते, औदुंबर पाडुळे, संदीप सोनार, बलभीम भोसले) 

शाळांची विद्यार्थी वाहतूक व्यवस्था कुचकामी 
सांगवी : सांगवी परिसरात विद्यार्थ्यांना शालेय बस व रिक्षा असो की व्हॅन यामध्ये अक्षरश: कोंबून व दाटीवाटीने शाळेत ने-आण केली जात आहे. परिसरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेली स्कूल बस व्यवस्था विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत असून, शाळा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सांगवी परिसरात अनेक इंग्रजी आणि सेमी माध्यमाच्या खासगी शाळा असून, या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास भाडे आकारून शाळेकडून घरपोच वाहन व्यवस्था केली जाते.

परंतु अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच वाहनात संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी बसवण्यात येऊन शाळेत ने-आण केली जाते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यावाहनांची वेळोवेळी तपासणी होते का हे तपासले जात नाही. वाहने सुस्थितीत नसल्याचे दिसून येते तर बसमध्ये व्हॅनमध्ये अग्निशमन सुरक्षा व्यवस्था तसेच मदतनीस नसल्याचे दिसून येते.
...........
वाहतूक  व्यवस्थापन समित्या कागदावरच 
रहाटणी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी बस वाहतूक व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. परंतु, सद्य:स्थिती पाहता या व्यवस्थापन समित्या कागदावरच असल्याचे दिसते. काही ठिकाणी तर अनेक रिक्षा, स्कूल बस अथवा खासगी वाहनांमधून वाहतूक पोलिसांसमोरून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेले जातात. 
पैशांची बचत होते म्हणून अनेक पालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही त्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेत पाठवतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या शहरावर व्हॅनचा सुळसुळाट झाला आहे़ रस्त्यावर पाहावे तिकडे खासगी व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून येत आहेत.
...............
निगडी : स्कूल बस, व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. शाळेत ने-आण करण्यासाठी ज्या खासगी व्हॅन वापरल्या जातात त्यात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याने हा प्रकार धोकादायक ठरू लागला आहे. पाल्याला सुरक्षित आणि वेळेत शाळेत पोहचता यावे म्हणून बरेचसे पालक आपल्या पाल्याला खासगी रिक्षाचालक, व्हॅनचालक यांच्या हवाली करत असतात. काही पालक आपल्या मुलांना शाळेच्या बसमध्ये पाठवत असतात, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. बरेचसे विद्यार्थी नियमितपणे संपूर्ण प्रवासात उभे राहून असतात. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत. 
..........
*विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक
रिक्षामध्ये तर आठ ते दहा विद्यार्थी दाटीवाटीनं बसलेले तसेच काही विद्यार्थी उभे असतात. बरेचसे पालक आळीपाळीने आपापले विद्यार्थी शाळेत सोडविणे आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी पार पडतात, यासाठी दुचाकीवर तीन ते चार विद्यार्थी दाटीवाटीनं बसवून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करत असतात. शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या फाटकाबाहेर बस, रिक्षा आणि पालकांची चारचाकी, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घोळक्याने बाहेर पडत असतात. यामुळे शाळा सुटल्यानंतर फाटकाबाहेरील आवारात आणि रस्त्यावर रोजच वाहतूककोंडी होत असते. सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी याच गर्दीतून मार्ग काढत असतात.

Web Title: The burden of school bag and big crowed in school vans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.