काळजी घ्या, घरी कुणीतरी वाट पाहतेय!; वेडे धाडस जीवघेणे, धोकादायक ठिकाणी टाळा 'सेल्फी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:22 PM2018-01-11T13:22:19+5:302018-01-11T13:29:03+5:30

लोणावळा-खंडाळा या भागात मोठी व्हॅली असल्याने या परिसराची मोहकता फोटोसोबत मोबाइलमध्ये टिपण्याकरिता पर्यटक सेल्फीचा जीवघेणा खेळ करतात.

Be careful, somebody waits at home!; avoid 'Selfie' at dangerous places | काळजी घ्या, घरी कुणीतरी वाट पाहतेय!; वेडे धाडस जीवघेणे, धोकादायक ठिकाणी टाळा 'सेल्फी'

काळजी घ्या, घरी कुणीतरी वाट पाहतेय!; वेडे धाडस जीवघेणे, धोकादायक ठिकाणी टाळा 'सेल्फी'

Next
ठळक मुद्देपर्यटनासाठी जाताना खबरदारी घेणे गरजेचेपरिसराची मोहकता टिपण्याकरिता सेल्फीचा जीवघेणा खेळ करतात पर्यटक

लोणावळा : मावळात आठवडाभरातील दोन घटनांमध्ये तीन युवा पर्यटकांचा मृत्यू झाला. एका भीषण अपघातात अतिवेगामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. लोणावळा-खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणांसह मावळ तालुक्यातील निसर्ग, धरणे, गड-किल्ले, लेण्या, व्हॅली पर्यटकांना साद घालत असल्याने लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळांवर शनिवारी-रविवारी व सलग सुटीच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी असते. 
शहरालगतच्या भुशी धरण परिसरात पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. उन्हाळी पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लायन्स पॉइंट, टायगर्स लिप्स, शिवलिंग पॉइंट परिसरात दिवसा व रात्री पर्यटकांची मोठी वर्दळ असते. या भागात मोठी व्हॅली असल्याने या परिसराची मोहकता फोटोसोबत मोबाइलमध्ये टिपण्याकरिता पर्यटक सेल्फीचा जीवघेणा खेळ करतात. व्हॅली भागाला वन विभागाच्या वतीने लोखंडी रेलिंग करण्यात आले असले, तरी युवा पर्यटक हे अतिउत्साहात रेलिंगवर बसून, तसेच रेलिंगच्या पलीकडे दरीच्या तोंडावर जात अपघाताला निमंत्रण देतात. ही मंडळी स्थानिकांचे देखील ऐकत नसल्याने या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. शेजारीच असलेला गिधाड तलाव व धबधबा हादेखील पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटनासाठी जाताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
खंडाळ्यातील शूटिंग पॉइंट असो वा राजमाची किंवा सनसेट पॉइंट या ठिकाणीदेखील मोठी दरी असून, या परिसरात अद्याप वन विभागाने रेलिंग लावण्याचे काम केलेले नाही. त्यामुळे या परिसरात दरीच्या तोंडावर जाऊन डोकावणे धोकादायक बनू शकते. मागील काळात या भागामध्ये अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. आग, पाणी व हवा यांच्या वाटेला जाऊ नये असे वारंवार सांगितले जात असले, तरी युवा पिढी या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत फाजील आत्मविश्वास बाळगून जीव धोक्यात घालत आहे. मात्र, हे करीत असताना आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे. आई-वडिलांच्या, या समाजाच्या आपणाकडून अनेक आशा-अपेक्षा आहेत, याचे भान या युवा पिढीला राहत नसल्याने पर्यटनस्थळांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळी   दिलेल्या सूचनांचे पालन करणे, स्वयंशिस्त बाळगणे नितांत गरजेचे आहे.

चढाओढीतून दुर्घटना शक्य
अमृतांजन पुलाला सध्या सुरक्षा जाळी बसविण्यात आली असली, तरी द्रुतगती महामार्गावरील नवीन पुलाच्या कठड्यावर धोकादायकपणे फोटो काढण्याकरिता पर्यटकांमध्ये चढाओढ लागलेली पाहायला मिळते. या परिसरात कायम जोराचा वारा वाहत असल्याने तोल जाऊन मोठी दुर्घटना घडू शकते.
पवनानगर परिसरात दूरवर पवना धरणाचा जलाशय पसरलेला असल्याने धरणाच्या सर्व भागावर नियंत्रण ठेवणे पाटबंधारे विभागाला शक्य नाही. याचाच गैरफायदा घेत या परिसरात फिरायला येणारे पर्यटक विशेषत: युवा पर्यटक धरणात उतरण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा पोहता येत नसले, तरी मित्रांच्या सोबत पाण्यात जातात. काही वेळा मुलीसमोर स्टंटबाजी केली जाते. यामुळे धरणात बुडून अनेकांची प्राणज्योत मावळली आहे.

सेल्फीच्या नादात अपघाताला निमंत्रण
मावळात असणाऱ्या किल्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. अनेक नवखे पर्यटक उत्साहाच्या भरात बुरजांवर बसून तर कधी धोकादायकरीत्या उभे राहून फोटो काढतात. तिकोना, तुंगी, लोहगड, विसापूर, राजमाची, ढाकचा बहिरी अशा ठिकाणी नवखे, उत्साही पर्यटक भान न ठेवता केवळ उत्साहाच्या भरात अपघाताला निमंत्रण देतात. अशा ठिकाणी धोक्याच्या सूचना लावूनदेखील त्याकडे काणाडोळा करण्याकडे पर्यटकांचा कल असतो. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय घसरल्याने थेट वीस ते पंचवीस फूट खोल दरीत पडण्याची शक्यता असते. तरीही पर्यटक अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नाही. किल्ल्यांवर असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पोहण्यासाठी उतरणे धोकादायक असते. या ठिकाणी गाळ, दगड यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. सेल्फी काढून तो फोटो सोशल मीडियावर पाठविण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊन पर्यटक अपघातालाच निमंत्रण देतात. 

Web Title: Be careful, somebody waits at home!; avoid 'Selfie' at dangerous places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.