- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला रिक्षात विसरलेले सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. रिक्षात विसरलेले दागिने परत मिळाल्याबद्दल महिलेने रिक्षाचालकाचे आभार मानले. वसीम शेख (एसबी कॅम्प, देहूरोड) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.
देहूरोड येथून रात्री साडेआठच्या सुमारास वैशाली भेगडे यांनी देहूरोड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांच्या हातात चार पिशव्या होत्या. देहूरोड रेल्वे स्थानकावर घाई गडबडीत त्या उतरल्या. त्यांची एक पिशवी रिक्षातच विसरली. त्या पिशवीत सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते.
रिक्षात दागिन्याची पिशवी विसरल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील सर्व रिक्षाचालकांकडे चौकशी केली. त्यांची गोंधळलेली अवस्था पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यांनीही शोधा-शोध सुरू केली. काहींनी त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात रिक्षाचालक देहूरोड स्थानकावरून दूर अंतर गेला होता. एका प्रवाशाने हात दाखवून त्याची रिक्षा थांबवली. त्या वेळी रिक्षात एका महिलेची पिशवी राहिली असल्याचे त्याच्या लक्षात
आले. तेथून तो परत देहूरोड स्थानकावर आला.

प्रवाशाला आला सुखद अनुभव
वैशाली भेगडे या रेल्वे स्थानकाबाहेर रडताना दिसल्या. रिक्षाचालकाने तातडीने तेथे जाऊन त्यांची दागिने असलेली पिशवी त्यांच्या स्वाधिन केली. रिक्षात विसरलेली दागिन्याची पिशवी रिक्षाचालकाने स्वत:हून आणून दिली. हा त्यांच्यासाठी सुखद अनुभव ठरला. त्यांनी रिक्षाचालकाचे मनापासून आभार मानले.