बीआरटीएस मार्गिकेत मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:56 PM2018-07-19T23:56:08+5:302018-07-19T23:57:17+5:30

वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहेत.

Alcohol drinks at BRTS Marg | बीआरटीएस मार्गिकेत मद्यपींचा अड्डा

बीआरटीएस मार्गिकेत मद्यपींचा अड्डा

Next

रहाटणी : शहरातील वाढते गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यासह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय, असा प्रश्न शहरातील नागरिकांना सातत्याने सतावत आहे. मात्र असे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. असे असताना पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचेच दिसून येत आहे. अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी देऊनही वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, परिसरातील रहिवासी कमालीचे वैतागले आहेत. या ठिकाणी महिलांना छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. या प्रकारात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या परिसरात रस्त्यावर बसून दारू पिणाºयांचे प्रमाण वाढले आहे. धनगरबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर दोन दारूचे दुकान आहेत. एक दुकान देशी दारूचे आहे, तर एक दुकान देशी व विदेशी दारूचे आहे. त्यामुळे या दुकानांच्या दोनशे ते तीनशे मीटर परिसरात रस्त्यावर बसून सर्रास दारू पिणारे बसलेले असतात. दारू पिण्याच्या वादातूनच काही दिवसांपूर्वी एकाचा खून झाला असल्याचा अंदाज आहे. ज्या दुकानाच्या समोर रोज ही मंडळी बसत असतात.
मात्र पोलिसांनी यावर वेळीच निर्बंध घातले असते तर कदाचित अशी वेळ आली नसती, अशी भावना या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
रस्त्यावर मद्यपींची मैफील भरते. या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणाºया हातगाड्यांवरसुुद्धा दारू पिण्यासाठी मद्यपी गर्दी करतात. या हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात घोळका जमा झालेला असतो. अनेक वेळा या हातगाड्यांवर भांडणाचे प्रकार झालेले आहेत. वाकड पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. हा सर्व प्रकार सायंकाळी सात ते रात्री अकराच्या दरम्यान सुरू असतो. सायंकाळी अगदी वर्दळीच्या वेळी हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील रहिवासी हैराण आहेत. दाद मागावी तरी कोणाकडे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

बीआरटी रस्त्यावर कांचाचा खच
काळेवाडी फाटा ते एम एम शाळा या दरम्यान बीआरटीएस रस्त्याचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले असल्याने या रस्त्यावर सध्या तरी इतरच वाहने अवैधरीत्या पार्क केली जात आहेत. मात्र याच वाहनांचा आसरा घेऊन काही मद्यपी या ठिकाणी बसून मद्यपान करीत आहेत. रिकामी झालेली बाटली दारूच्या नशेत त्याच ठिकाणी फोडली जात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचा दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून हा रस्ता साफ करण्यात आला होता. मात्र, अद्यापही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचा आहेत.
ठोस कारवाईची मागणी
वाहनचालक, रहिवासी, ये-जा करणाºया नागरिकांची पर्वा न करता दारुडे भर रस्त्यात, राजरोसपणे मद्यपान करताना दिसून येतात. एखाद्याने त्यांना हटकलेच, तर दादागिरीची भाषा त्यांना करतात. काही स्थानिक नागरिकांनी त्यांना हटकले असता मद्यपी त्यांना जुमानत नाहीत. वाकड पोलीस स्टेशन व काळेवाडी पोलीस चौकीला तक्रारी करूनही मद्यपींवर कारवाई झालेली नाही. रस्त्यावर मद्यपींची गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अतिक्रमण कारवाई नाही
थेरगावच्या धनगरबाबा मंदिरासमोरच दारूचे दुकान आहे. अनेक नागरिक चकना घेण्यासाठी इतरत्र जातात म्हणून काहींनी याच ठिकाणी हातगाडी सुरू केली आहे. मात्र याच गाडीवर मद्यपान केले जात आहे. या अनधिकृत हातगाडीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही. या दारू दुकानाशेजारीच सोसायटीचे मुख्य प्रवेशव्दार आहे. दारू खरेदीसाठी येणारे ग्राहक सोसायटीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरच बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग करतात. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यात वाहने उभे करून मद्यपान
सध्या पावसाचे दिवस असल्याने उघड्यावर मद्यपान करणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक रस्त्यात वाहन उभे करून वाहनातच मद्यपान करतात. बीआरटीएस रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला जागा मिळेल तेथे वाहन अनधिकृतपणे पार्क करून अशाप्रकारे मद्यपान करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बीआरटीएस मार्गिका सुरूनसल्याने हा रस्ता बंदच आहे. त्यामुळे पोलीसही या रस्त्याच्या आत काय सुरू आहे हे पाहत नाहीत. याचाच फायदा घेत अनेक मद्यपी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले असतात. मात्र, त्यांवर कारवाई अपेक्षित असताना पोलीस मात्र काणाडोळा करीत आहेत.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी, शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिल्याने काही प्रमाणात यावर निर्बंध येतील, असे वाटले होते. मात्र असे काही होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणचे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. काही ठिकाणी असे धंदे बंद असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. मात्र याला वाकड पोलीस स्टेशन अपवाद ठरले आहे.
धनगरबाबा मंदिरासमोर दारूचे दुकान आहे. शेजारीच आनंद पार्क हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. तरीही अनेक मद्यपी त्या ठिकाणाहून दारूची बाटली, पाणी, ग्लास घेऊन पदपथावर जागा मिळेल त्या ठिकाणी मैफील जमवीत आहेत. काही अंतरावर देशी दारूचे
दुकान आहे. तेथे सुद्धा अनेक मद्यपी घोळक्या-घोळक्याने बसलेले असतात. अनेक वेळा महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकारही होत आहेत. महिलेला पाहून अश्लील संभाषण करणे, तसेच आपापसात बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत.

Web Title: Alcohol drinks at BRTS Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.