अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:24 AM2018-04-19T04:24:11+5:302018-04-19T04:24:11+5:30

अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. हा प्रकार आता नागरिकांच्या सवयीचा झाला आहे.

Administration neutral for encroachment action | अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासन उदासीन

अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासन उदासीन

Next

चिंचवड : मुख्य रस्ते व चौकात हातगाडी व्यावसायिकांनी कब्जा केल्याचे वास्तव चिंचवड परिसरात दिसत आहे. यामुळे होणारी वाहतूककोंडी व अपघाताचे प्रमाण वाढत असूनही पालिका प्रशासन व वाहतूक विभाग कारवाईबाबत उदासीन असल्याचे समोर येत आहे. तात्पूर्ती कारवाई करीत शिस्त लावण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक दबावाखाली असल्याने कारवाई करत नसावेत, अशी चर्चा आता जोर धरत आहे.
चापेकर चौकातील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. हा प्रकार आता नागरिकांच्या सवयीचा झाला आहे. अत्यंत वर्दळीचा असणारा अहिंसा चौकाची ओळख हातगाडी चौक अशी झाली आहे. या भागात सायंकाळी हातगाडी व्यावसायिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यामुळे वाहतूककोंडी ही मुख्य समस्या झाली आहे. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. येथील समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन व स्थानिक वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत आहे. येथे हातगाडी लावण्यासाठी हप्ता पद्धत असल्याची चर्चा आहे. यामुळे येथील हातगाड्यांवर कारवाई होत नाही.
काकडे पार्क परिसरातील चौकातही परिस्थिती गंभीर झाली आहे. या भागात भाजीविक्रेते हातगाड्यांवर व्यवसाय करीत असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिसरात शाळा असल्याने वर्दळ जास्त असते. या भागात पार्किं गसाठी पुरेशी जागा नाही. रस्त्यावर हातगाड्या उभ्या असल्याने वाहतूक समस्या नित्याचीच झाली आहे. पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाकडून हातगाड्यांवर वारंवार कारवाईचा दिखावा केला जातो. मात्र ठोस कारवाई होत नाही. बिजलीनगरातील मुख्य रस्त्यांवर हीच समस्या कायम आहे. याचबरोबर फिरत्या हातगाडी व्यावसायिकांनी सायंकाळी आपआपल्या जागा निच्छित केल्याने मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

दुर्घटनेनंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार का?
निगडी : रस्त्यावरील अतिक्रमणे आणि पथारीवाल्यांचे रहदारीला होणारे अडथळे यासारखे मुद्दे ऐरणीवर आहेत. मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही वाहतुकीचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. वाहनस्वारांची बेशिस्त, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, यामुळे रस्त्यांवरील विशेषत: सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे डोळेझाक होत आहे. जवळपास सर्वच भागातील पदपथ गायब झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्याचे कोणालाही सोयर-सुतक नाही. एखादी दुर्घटना झाल्यानंतरच आपले डोळे उघडणार आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

व्यावसायिकांचीच वाढली दंडेलशाही
पिंपळे गुरव : अतिक्रमण विभागाची गाडी येणार त्या आधीच, खासगी व्यावसायिक आपले साहित्य घेऊन धूम टाकतात. त्यामुळे कारवाई फक्त देखाव्यासाठी होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. परिसरातील प्रमुख रस्त्यांवर रुंदीकरण करून नागरिकांना रस्त्यावर चालता यावे, म्हणून रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून पदपथ निर्माण केले आहेत. मात्र या पदपथांवर व्यावसायिकांची दंडेलशाही व मक्तेदारी वाढली आहे. महापालिकेने नागरिकांसाठी पदपथ बनविले़ मात्र पदपथांचा वापर कोणासाठी हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक, रामकृष्ण चौक, लक्ष्मीनगर ६० फुटी रस्ता, कृष्णा चौक, जुनी सांगवीतील शितोळेनगर चौक, गुरुनानक चौक, नवी सांगवीतील फेमस चौक, साई मिनी मार्केट, शिवनेरी चौक, दापोडीतील शितळादेवी चौक, आंबेडकर चौक आदी चौक नगरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. बहुतांश चौकांमध्ये दुकानदार व व्यावसायिकांनी जणू पदपथावर आपल्या मालकी हक्काचा सातबाराच कोरला आहे. मुख्य चौकांमध्ये आपला व्यवसाय तेजीत चालावा म्हणून आपले बस्तान ऐन चौकात मांडतात. त्यामध्ये टायर पंक्चर, वडा पाव, भाजीविक्रेते, फर्निचर, हार्डवेअर आदी दुकाने आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

चापेकर चौकातील उड्डाणपुलाचा वापर जनावरांसाठी
चापेकर चौकातील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले आहे. घोडे, शेळ्या, गायी बांधण्यासाठी या जागेचा वापर होत आहे. व्यावसायिक वाहनांनी या जागेवर हक्क दाखविल्याचे चित्र दिसत आहे. या भागातील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिकेचा अतिक्रमण विरोधी पथकाला जाग येते. कारवाईसाठी हा विभाग बाहेर पडतो. मात्र ते पोहोचण्यापूर्वीच याची खबर त्या भागातील व्यावसायिकांना मिळालेली असते. या प्रकारामुळे काही काळ चौकातील रस्ते मोकळा श्वास घेतात. चापेकर चौक व अहिंसा चौकात हातगाडी व्यावसायिकांनी रस्ते गिळंकृत केले आहेत. चापेकर चौकात भाजीविक्रते व खाद्य पदार्थ विक्री करणाºया व्यावसायिकांची मनमानी झाली आहे. काही दादा मंडळी व राजकीय व्यक्तींचा यांच्या डोक्यावर हात असल्याने अशा हात गाड्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अतिक्रमण विभागाकडून या भागात कारवाई होते़ मात्र कारवाई करणारी यंत्रणा निघून जाताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. अशा प्रकारची कारवाई कित्येकदा होत असते. परंतु येथील रस्ते मोकळे झालेले दिसत नाहीत हा महत्त्वाचा विषय आहे. कारवाई करणाºया अधिकाºयांवर राजकीय दबाव असल्याने ठोस कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.


कारवाईनंतर ‘जैैसे थे’
प्रशस्त रस्ते ही शहराची वेगळी ओळख आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने भले मोठे रस्ते तयार केले. त्यामुळे सुरळीत व वेगवान वाहतूक होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि पथारीवाल्यांचा स्वैर संचार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरातील वाहतुकीचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत.
महापालिका आणि वाहतूक पोलीस विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसला असल्याने नागरिकांच्या जिवावर बेतण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसारखी दुर्घटना घडण्याचीच आपण वाट पाहतो आहोत आणि तसे झाल्याशिवाय आपले डोळे उघडणारच नाहीत का? निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिखली परिसर अशी उदाहरणे आहेत़
सध्या अतिक्रमण विभागाकडून पदपथावर असलेले अतिक्रमण, हातगाडीधारक यांच्यावर कारवाई होते़ परंतु कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणच्या पदपथावर व रस्त्यावर भाजी विक्रेते, हातगाडीधारक पुन्हा आपली दुकाने थाटतात. यामुळे अतिक्रमण विभागाची कारवाई केवळ नावालाच असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
 

Web Title: Administration neutral for encroachment action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.