आॅनलाइन फसवणुकीची टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:07 AM2018-02-05T01:07:23+5:302018-02-05T01:07:39+5:30

शहरात इंटरनेट बँकिंग, तसेच आॅनलाइन आर्थिक व्यवहारांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Activate online fraud team | आॅनलाइन फसवणुकीची टोळी सक्रिय

आॅनलाइन फसवणुकीची टोळी सक्रिय

Next

पिंपरी : शहरात इंटरनेट बँकिंग, तसेच आॅनलाइन आर्थिक व्यवहारांतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. कोणाला वैयक्तिक बँक खात्याची माहिती घेऊन लाखोंचा गंडा घातला आहे. परदेशी उत्पादनाचे भारतातील वितरक बनवतो, असे नोकरीचे आमिष दाखवून, तर आॅनलाइन मोटार विक्रीची जाहिरात देऊन काहींना गंडा घालणारी टोळी सक्रीय आहे. सामान्य नागरिकांबरोबर शासकीय अधिकारी आणि बँकाही फसवणुकीच्या बळी ठरल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांत तीन कोटींहून अधिक रक्कम आॅनलाइन फसवणुकीद्वारे भामट्यांनी परस्पर लुटली आहे. कस्टममध्ये तुमचे साहित्य अडकले आहे. त्यासाठी काही रक्कम आॅनलाइन भरा, असे सांगून पिंपरीगाव येथील एका डॉक्टर महिलेची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. क्रेडिट कार्डची माहिती लिक झाल्याचे सांगून व कार्डची गोपनीय माहिती विचारून एका तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरीत उघडकीस आला होता. कधी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तर कधी गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असे भासवून विशिष्ट बँक खात्यात आॅनलाइन पैसे भरण्यास भाग पाडून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालण्याचे भामट्यांचे उद्योग सुरू आहेत.
पोस्टाची खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची ६४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकीतील एका बँक अधिका-याने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टाचे बनावट शिक्के, तसेच अधिका-यांच्या खोट्या सह्यांचे लेटरपॅड सादर करून चार आरोपींनी खडकीतील बँकेची फसवणूक केली. किसान विकास पत्रावर ६४ लाख ४० हजारांचे कर्ज घेतले. केवळ बँकचे ग्राहकच नाही, तर पोस्ट, बँक अशा शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आर्थिक गंडा घालण्यापर्यंतची मजल भामट्यांनी गाठली आहे.
>उद्योगनगरीत नायजेरियन टोळी
फेसबुकवर प्रोफाइल बनवून ग्राहकांना कोटींचा गंडा घालणा-या रॅकेटचा पर्दाफाश केला. चिंचवडमधील व्यापा-याची एक कोटींची फसवणूक करणा-या नायजेरियन टोळीला मुंबई सायबर गुन्हे शाखेने शिताफिने पकडले. टोळीतील आरोपी फेसबुकवर बनावट प्रोफाइल बनवून ते ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठवत. जो रिक्वेस्ट स्वीकारेल त्याला ते आयुर्वेदिक तेलाबद्दल माहिती देऊन या तेलाची खरेदी करून त्याच्या विक्रीतून मिळणा-या भरघोस नफ्याबद्दल सांगत. एखादा ग्राहक या जाळ्यात फसला की, ते त्याला फोनवरून संपर्क साधत व त्यांच्या चेन्नई येथील एका बँक खात्यावर रक्कम भरायला सांगत. त्यातून त्याची फसवणूक केली जात असे.
>संकेतस्थळावरील जाहिरातीतून गंडा
विवाह जुळविणा-या संकेतस्थळावर जाहिरात देऊन शहरातील काहींना गंडा घातल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. विवाहविषयक जाहिरातीतून चार जणांची फसवणूक झाली आहे. सांगवीतील एका वयोवृद्ध व्यक्तीने तर चक्क १८ लाख रुपये आॅनलाइन भरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. फेसबुकवर मैत्री केलेल्या एका डॉक्टर महिलेला आॅनलाइन ४५ लाखांना गंडा घातला. आॅनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये असुशिक्षित व्यक्तींपेक्षा सुशिक्षित व्यक्तींची संख्या मोठी आहे. कर्ज देणा-या वित्त संस्थेच्या नावाने संकेत स्थळावर माहिती देऊन भामट्यांनी शहरातील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. एका महिलेलची ६१ हजारांची फसवणूक झाली आहे.
एटीएम केंद्रात हातचलाखी
एटीएम केंद्रात थांबून मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची अदलाबदल करून मोठ्या रकमा काढून भामट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. हिंजवडी परिसरात तर एटीएम कार्ड, डेबिट कार्डचे क्लोन तयार करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कार्डची माहिती घेऊन एखाद्याच्या बँक खात्यातून तशाच प्रकारच्या दुसºया कार्डच्या साह्याने परस्पर रक्कम वर्ग करण्याचे उद्योग भामट्यांनी केले.

Web Title: Activate online fraud team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन