चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:46 AM2019-03-23T02:46:32+5:302019-03-23T02:46:58+5:30

गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

360 people die of snakebite, three deaths in fourteen months | चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

चौदा महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश, तीन जणांचा मृत्यू

googlenewsNext

- प्रकाश गायकर

पिंपरी  - गेल्या १४ महिन्यांमध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयामध्ये (वायसीएम) साप चावल्याप्रकरणी ३६० जणांना दाखल केले होते. त्यापैैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये गारव्याच्या शोधात येतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शहरातील सोसायट्या व इतर ठिकाणी साप आढळून येतात, असे सर्पतज्ज्ञांनी सांगितले.

वायसीएममध्ये खेड, जुन्नर, मावळ, आंबेगाव या ग्रामीण भागामधून सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होतात. याबरोबरच शहरामध्ये नदीकिनारी भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या १४ महिन्यांमध्ये ३६० जणांना सर्पदंश झाल्याची नोंद वायसीएममध्ये आहे.
उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर ते सापांना असह्य होते. तापमान वाढल्यास साप शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी साप गारवा शोधत मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. सोसायट्यांच्या आवारातील उद्याने तसेच जमिनीवर ठेवलेल्या कुंड्या या ठिकाणी थंडावा असल्याने साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. त्याचप्रमाणे चेंबरमध्येही अनेक वेळा साप आढळतात. शहर व आसपासच्या भागामधून दर वर्षी सुमारे १० ते १२ हजार साप पकडून शहराबाहेर सुरक्षित स्थळी सोडले जातात.

शहरामध्ये सर्पदंशाचे प्रमाण कमी असले, तरी सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे सर्पमित्रांना आढळून आले आहे. त्यामुळे सर्पदंशापासून सावध राहणे आवश्यक आहे.

सर्पदंशानंतर रुग्णाला द्यावी लागणारी लस वायसीएममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे रुग्णाला जीव गमावावा लागू शकतो. सर्पदंश झाला तर तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करावे. - डॉ. शंकर जाधव, उपअधीक्षक,
वायसीएम रुग्णालय

थंडावा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीमध्ये येतात. सापांना अतिथंड व अतिउष्ण दोन्हीही वातावरण सहन होत नाही. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना चप्पल परिधान करूनच बाहेर पडावे, तसेच हातामध्ये टॉर्च ठेवावा. सोसायटीमध्ये अथवा इतर ठिकाणी कोठेही साप आढळल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी दंश करण्याची शक्यता जास्त असते. सर्पमित्रांना कळवावे. जेणेकरून ते सापांना मानवी वस्तीपासून सुरक्षितपणे दूर सोडतील.
- राजू कदम, सर्पमित्र

Web Title: 360 people die of snakebite, three deaths in fourteen months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.