जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 04:17 PM2019-01-17T16:17:52+5:302019-01-17T16:38:26+5:30

पॅरिसमधील ऐतिहासिक वास्तू म्हणजे 'आयफेल टॉवर'. आयफेल टॉवर ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दररोज पॅरिसला भेट देत असतात.

आयफेल टॉवर ही 1889 रोजी बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर 324 मीटर (1,063 फूट) उंच आहे व त्याला तीन मजले आहेत.

आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुशास्त्रकाराला दिले जाते. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.

आयफेल टॉवर ही पॅरिसमधील सर्वांत उंच इमारत आहे. 1889 ते 1930 या काळादरम्यान ती जगातील सर्वांत उंच इमारत होती.

आयफेल टॉवरचे बांधकाम हे 1887 ते 1889 या काळात करण्यात आले. 31 मार्च 1889 रोजी त्याचे उद्घाटन झाले तर 6 मे 1889 रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला.

आयफेल टॉवरच्या पहिल्या दोन मजल्यांवर पर्यटकांसाठी रेस्टॉरंटची सुविधाही आहे. तिसरा मजला हा टेहळणीसाठी आहे व येथून पॅरिस शहराचे अत्यंत विहंगम दृश्य पाहता येते. सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जवळपास 1,665 पायऱ्या चढाव्या लागतात.