भारतातील 'या' ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोनं दिलं जागतिक वारसा यादीत स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 03:25 PM2019-01-04T15:25:30+5:302019-01-04T15:33:53+5:30

भारत देशाला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक राजे-महाराजे, सम्राट इथे होऊन गेलेत. या इतिहासाच्या खुणा अजूनही टिकून आहेत. अनेक प्राचीन मंदिरं, भव्य राजवाडे, महाल, किल्ले अशा वास्तूंमधून या वारशाचं दर्शन घडतं. जागतिक वारसा यादीत स्थान असणाऱ्या अशाच काही ऐतिहासिक वास्तूंबाबत जाणून घेऊया.

ताजमहाल - आग्रा येथील 'ताजमहाल' जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात.

आग्र्याचा किल्ला - आग्र्याच्या ताजमहालला येणारे पर्यटक आग्र्याचा किल्लाही आवर्जून पाहतात. या किल्ल्यात अनेक ठिकाणी गुप्त खजिना असल्याचं मानलं जातं. आग्र्याचा किल्ला ताजमहालपासून 2.5 किमी अंतरावर आहे.

हंपी - हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हंपी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हंपी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

कोणार्क सूर्य मंदिर - कोणार्कचे सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधले आहे. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरीपासून 35 किमी तर भुवनेश्वरपासून 65 किमी आहे.

राणीची विहीर - 11व्या शतकात सोलंकी साम्राज्यावेळी ऐतिहासिक विहिरीची निर्मिती करण्यात आली. यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला जागतिक वारसा स्थान दिलंय. सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या या विहिरीच्या खाली एक छोटा दरवाजा आहे. राणीची विहीर ही 64 मीटर लांब, 20 मीटर रूंद आणि 27 मीटर खोल आहे.

भीमबेटका रॉक शेल्टर्स - भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान आहे. भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात हे ठिकाण आहे. भोपाळपासून 45 किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे पाहायला मिळतात.

खजुराहो मंदिर - खजुराहो हे ठिकाण भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे. 10-12 शतकात चंडेल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समुहासाठी हे ठिकाण प्रख्यात आहे.

पश्चिम घाट - सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची ही डोंगररांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते.

महाबलीपुरम - चेन्नईपासून अवघ्या 60 किमी असलेले महाबलीपुरम हे भव्य मंदिरे, स्थापत्य व सुंदर सागरतटासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. सातव्या शतकातील हे शहर पल्लव राजांच्या राजधानीचे शहर होते. द्रविड शैलीतील वास्तूकला जगभरात प्रसिद्ध असून दरवर्षी येथे शेकडो देशी विदेशी पर्यटक हजेरी लावतात.

सांचीचा स्तूप - सांचीचा स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून 45 कि.मी. तर विदिशापासून 9 कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.

नंदादेवी - नंदादेवी हे भारताचे उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे व संपूर्णपणे भारतात असलेले सर्वोच्च शिखर आहे. याची उंची 7,816 मीटर असून हे शिखर भारताच्या उत्तराखंड या राज्यात आहे.

अजिंठा-वेरूळ लेणी - अजिंठा-वेरूळची लेणी या जग प्रसिद्ध लेणी असून ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 साली घोषित केली आहे. या लेणीला भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे.