ये है फॅशन का जलवा! डोंबिवलीत रंगला श्वानांचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 03:53 PM2017-11-27T15:53:51+5:302017-11-27T15:58:04+5:30

डोंबिवली : अनेक जातीच्या, रंगाच्या आणि आकाराच्या श्वानांनी संगीताच्या तालावर, रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून रॅम्पवॉक केला.

श्वानांनी केलेला हा 'रॅम्पवॉक' लक्षवेधी ठरला. निमित्त, होते ते रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्वानांच्या 'फॅशन शो'चे.

येथील स.वा. जोशी शाळेच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी डोंबिवली, कल्याण, पुणे, रायगड, ठाणे, नेरळ, कजर्त, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणाहून श्वान सहभागी झाले होते.

याचबरोबर, यामध्ये 22 जातीच्या 200 हून अधिक श्वानांचा सहभाग होता.

बर्फाळ प्रदेशातील सायबेरीन हास्की, सेंट बर्नाड, माऊंटन डॉग, उंदराइतका लहान दिसणारा चुहाहुआ आणि पॉकेट पॉम डॉग, पोलिस डॉग, लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, जाँईट ब्रिड, गेट्र डेन, न्युओपोलिन मासचिफ, सिक्युरिटी डॉग, डॉबरमॅन आणि रॉटवायलर या जातीच्या श्वानांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

श्वानांचा 'रॅम्पवॉक' पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला जवळपास तीन हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

तसेच, यावेळी श्वानांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी 200 हून अधिक डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले होते.

या स्पर्धेत किंग ऑफ शो निळजेचा रेम्बो (गेट्र डेन) तर क्वीन ऑफ शो डोंबिवलीची फ्लुफी (लॅब्राडॉर) यांनी किताब पटकाविला.

टॅग्स :कुत्राdog