WhatsApp वरचे 'हे' मेसेज आहेत अत्यंत धोकादायक; चुकूनही करू नका क्लिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:08 PM2019-01-02T15:08:42+5:302019-01-02T15:36:22+5:30

WhatsApp हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम आहे. मात्र WhatsApp च्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. WhatsApp वर दिवसाला अनेक मेसेज येत असतात. पण त्यातील काही धोकादायक मेसेजवर क्लिक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाच काही वायरल मेसेजबाबत जाणून घेऊया.

अॅमेझॉनच्या बिग बिलियन सेल ऑफरच्या नावाने एक स्पॅम मेसेज जोरदार व्हायरल होतो. यामध्ये एक लिंक देण्यात आलेली असते. त्यावर क्लिक केल्यास भेटवस्तू मिळतील असं ग्राहकांना सांगितलं जातं. मात्र असा मेसेज आल्यास लिंकवर क्लिक न करता डिलीट करा.

WhatsApp वर अनेक लोकांना पिझ्झा हटच्या नावाने फेक मेसेज येत असतात. त्यामधील लिंकवर क्लिक केल्यास मोफत पिझ्झा मिळेल असं सांगितलं जातं. मात्र अशाप्रकारे अनेकांना पिझ्झाच्या नावाने फसवण्यात आले आहे.

WhatsApp एक निशुल्क मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळेच हे अॅप कोणताही सर्विस चार्ज घेत नाही. मात्र जर तुम्हाला WhatsApp च्या काही सेवांसाठी पैसे भरण्याचा मेसेज आला तर तो एक फेक मेसेज आहे हे लक्षात ठेवा.

अॅमेझॉनप्रमाणे फ्लिपकार्टवर असलेल्या सेलच्या नावानेही अनेक मेसेज हे येत असतात. मात्र मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा लिंक क्लिक करू नका.

अॅपलच्या नावाने WhatsApp वर अनेक मेसेज जोरदार व्हायरल होत असतात. त्यामध्ये ऑफर्सअंतर्गत 999 रुपयांमध्ये आयफोन दिले जाईल असे सांगितले जाते. मात्र अॅपल कंपनी अशी कोणतीही ऑफर देत नाही त्यामुळे असा मेसेज आल्यास सावध व्हा.

WhatsApp सारख्या दिसणाऱ्या थर्ड पार्टी अॅपच्या जाळ्यात अजिबात फसू नका. अशा प्रकारचे फेक अॅप डाऊनलोड केल्यास तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. नेहमी प्ले स्टोर अथवा अॅप स्टोरवरून अधिकृत अॅप इन्स्टॉल करा.

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यामुळेच WhatsApp च्या बाबतीतही अनेक मेसेज हे सातत्याने येत असतात. WhatsApp चा रंग बदलण्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र तो मेसेज खोटा आहे.

adidas हा एक लोकप्रिय ब्रँड आहे. 3,000 शूज कंपनी मोफत देत असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र कंपनीने अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

धार्मिक स्थळांच्या नावे अनेक मेसेज हे व्हायरल होत असतात. पैसे देऊन लवकर दर्शन मिळणार असा मेसेज आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करू नका. तसेच हा फेक मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका.

adidas प्रमाणे ZARA हा ब्रँडही खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ZARA च्या फ्री वाउचर्सच्या नावाने स्पॅम मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांकडे डेटा मागितला जातो. त्यानंतर फसवले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या मेसेजपासून सावध राहा.

अॅमेझॉन प्राइम किंवा प्रीमियम सर्विसप्रमाणे WhatsApp वर गोल्ड नावाची सर्विस अपग्रेड करण्याचा एक मेसेज येतो. मात्र WhatsApp Gold नावाची कोणतीही सेवा नाही. त्यामुळे अशा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून तो मेसेज डिलीट करा.