'रेडमी ५' घ्यायचा विचार करताय?... आधी 'या' सहा गोष्टी वाचून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:20 PM2018-03-15T13:20:24+5:302018-03-15T13:20:24+5:30

भारतीय बाजारपेठेत धुमशान करणाऱ्या शाओमी कंपनीने आपला रेडमी ५ हा स्मार्टफोन बुधवारी लाँच केला आहे. स्वस्तात मस्त फीचर्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या फोनवरही स्वाभाविकच मोबाइलप्रेमींच्या उड्या पडतील. तुम्हीही हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर आधी त्याच्या गुणदोषांवर एक नजर टाकून घ्या...

जमेची बाजूः सर्वात स्लिम फोन रेडमी सीरिजमधील सगळ्यात स्लिम मॉडेल म्हणून रेडमी ५ आपलं लक्ष वेधून घेतो. आधीच्या व्हर्जनपेक्षा त्याची जाडी ४ ते ११ टक्क्यांनी कमी आहे.

उणीवः कमी पॉवरफुल्ल बॅटरी रेडमी ५ ची बॅटरी ३३०० एमएएच क्षमतेची आहे. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत ती तितकीशी पॉवरफुल्ल नाही. रेडमी ४ ची बॅटरी ४१०० एमएएच क्षमतेची होती.

जमेची बाजूः फ्रंट फ्लॅश सेल्फीप्रेमींसाठी शाओमीनं रेडमी ५ मध्ये पुढच्या बाजूलाही एलईडी फ्लॅश दिला आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रोमध्येही हे फीचर देण्यात आलंय.

उणीवः प्रोसेसरही कमी क्षमतेचा शाओमीनं आपल्या नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर वापरला आहे. परंतु, या किमतीच्या अन्य फोनचा विचार केल्यास यापेक्षा दमदार प्रोसेसरचे फोनही बाजारात आहेत. रेडमी नोट ५ चा पर्यायही चांगला ठरू शकतो.

जमेची बाजूः जबरदस्त रिजोल्युशन रेडमी ५च्या ५.७ इंची एचडी+ डिस्प्लेचं रिजोल्युशन ७२०x१४४० पिक्सल आहे. त्यामुळे सिनेमा पाहणं किंवा गेम खेळणं अधिक आनंददायी होऊ शकतं.

उणीवः तगडी स्पर्धा रेडमी ५ ला शाओमीचीच अनेक मॉडेल्स तगडी स्पर्धा देऊ शकतात. साधारण याच किंमतीत शाओमीचे आणि इतरही कंपन्यांचे बरेच हायटेक फोन बाजारात आहेत. त्यामुळे रेडमी ५ खरेदी करण्याआधी इतर फोनच्या फीचर्सशी त्याची तुलना करून घेणं फायदेशीर ठरू शकतं.

त्यामुळे हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर आधी त्याच्या गुणदोषांचा एकदा नक्की विचार करा.