ValentineDay2018 : पाहा गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 08:01 PM2018-02-06T20:01:33+5:302018-02-07T09:22:45+5:30

रोझ डेला कुणाला गुलाब देऊन आपल्या मनातल्या भावना मांडायच्या असतील, तर आम्ही तुमची मदत करु. कारण प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच प्रत्येक गुलाबाचंही वैशिष्ट्य असतं. तर यापैकी तुम्हाला नक्की कोणती भावना आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करायची आहे ते ठरवा आणि आपल्या मनातल्या व्यक्तीला त्या रंगाचं गुलाब द्या.

लाल रंगाचं गुलाब प्रेम आणि जबर आकर्षणाचं प्रतिक मानलं जातं. गेल्या हजारो वर्षांपासून ते आतापर्यंत आणि याहीपुढे कायमच प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब सर्वात योग्य मार्ग मानला जातो.

पिवळीधम्मक गुलाबाची फुलं मैत्रीचं प्रतिक असतात. व्हॅलेंटाईन आठवडा प्रेमाने साजरा करताना त्यात रोमान्सच असणं आवश्यक नाहीये. ते प्रेम मैत्री, आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांच्यातलंसुध्दा असु शकतं.

पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून जांभळ्या गुलाबाला मानलं जातं. पहिल्या नजरेत प्रेम तसं क्वचितच होतं आणि जांभळ्या रंगातली गुलाबसुध्दा तितकीच दुर्मिळ असतात. त्यामुळे आपल्या जरा जास्तच खास व्यक्तीला खास फिलींग आणून देण्यासाठी हे गुलाब देऊ शकता

पांढरं गुलाब स्वच्छतेचं, शुध्दतेचं आणि शांतीचं प्रतिक मानलं जातं. तसंच परिपुर्णतेचं, चांगलेपणाचं आणि निष्पापतेचं प्रतिक असतं. काही लग्नांमध्ये या पांढऱ्या गुलाबांचा वापर नव्या सुरुवातीचं प्रतिक म्हणून केला जातो.

केशरी रंग पिवळ्या व लाल रंगांनी मिळून बनलेला असल्याने त्याच्यात पिवळ्या रंगांची उर्जा आणि लाल रंगातली प्रचंड आवडसुध्दा समाविष्ट असते. या रंगात आनंद, उर्जा, आकर्षण, तीव्र इच्छाशक्ती ही प्रतिकं मानली जातात.

गुलाबी रंग तर प्रेमाचा आणि रोमान्सचा अधिकृत रंग मानला जातो. हा सुंदर रंग प्रेमाच्या खुणांना जास्त अधोरेखित करतो. एखाद्या व्यक्तीविषयीची कृतज्ञता आणि कौतुक या रंगाच्या गुलाबातून व्यक्त करता येतं.

हिरवा रंग आरोग्य, संपन्नता आणि समृध्दीचं प्रतिक मानलं जातं. मात्र थोड्या वेगळ्या हिरव्या रंगात जळकुटेपणाची चिन्ह असल्यानं तो हिरवा रंग दूर ठेवला जावा. जर तुम्हाला कुणाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना हिरव्या रंगाच्या गुलाबांचा गुच्छ देऊ शकतो.