दोघात तिसरा ठरतोय का स्मार्टफोन?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:20 PM2018-10-10T15:20:51+5:302018-10-10T15:34:21+5:30

हल्ली सर्वांनाच सकाळ-दुपार-संध्याकाळ फोनवर वेळ घालवण्याची सवय लागली आहे. लोक एक क्षणही फोनपासून दूर राहू शकत नाहीत. फोनवरच जास्त वेळ दिला जात असल्यानं नात्यांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. याचे रुपांतर वाद, भांडण, नात्यात फूट पडणे, असे वाईट परिणाम दिसून येताहेत. आपले नाते कायम टिकून राहावे,असं वाटत असल्यास स्मार्टफोनची गरजेपेक्षा अधिक सवय झाली असेल तर वेळीच सावध व्हा. 1. कॉलचे उत्तर न देणं : घराबाहेर असताना अनेकांना कोणत्याही कॉलचे उत्तर देणे महत्त्वाचं वाटत नाही. मग एखाद्याचे कितीही महत्त्वाचे काम असो. बऱ्याच जणांना फोन उचलून बोलणे त्रासदायक वाटतं.

2. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणं : अनेकांना दिवसभर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर अॅक्टिव्ह राहणं आवडतं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना ही लोक वास्तविक जीवनातील आनंद अनुभवण्यास मुकतात. पार्टनर किंवा आपल्या नातेवाईकांसोबत असतानाही सोशल मीडियावर सक्रीय राहणं त्यांना आवश्यक वाटते. यामुळे नात्यात फूट पडण्याची अधिक शक्यता असते.

3. नात्यांना वेळ न देणे : दिवसभर सोशल मीडियावर सक्रिय राहिल्यामुळे काहीजण जवळच्या नात्यांना जरासाही वेळ देत नाहीत. सोशल मीडिया मनोरंजनाचे चांगले साधन आहे, मात्र याची सवय करुन घेऊ नका.

4. नात्यांकडे दुर्लक्ष करणं : स्मार्टफोन सतत हाताळणाऱ्या मंडळींचे नात्याकडे दुर्लक्ष होते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोबाइल, फेसबुक, इन्स्टाग्रामवर राहण्यापेक्षा वास्तविक जीवनाला अधिक महत्त्व द्या.